तळेगाव ढमढेरे : वहिवाटीचा रस्ता बंदप्रकरणी अधिकारी लक्ष देणार काय? | पुढारी

तळेगाव ढमढेरे : वहिवाटीचा रस्ता बंदप्रकरणी अधिकारी लक्ष देणार काय?

तळेगाव ढमढेरे; पुढारी वृत्तसेवा : टाकळी भीमा (ता. शिरूर) येथील अनेक वर्षांपासून वाहिवाटीचा रस्ता अनधिकृत प्लॉटिंगधारकाने बंद केला आहे. याबाबत महसूल विभागाचे अधिकारी काय भूमिका घेणार? शेतकर्‍यांना न्याय मिळवून देणार, की धनदांडगे असलेल्या प्लॉटिंगधारकाला तारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टाकळी भीमा (ता. शिरूर) येथील एका प्लॉटिंगधारकाने चालू वाहिवाटीचा रस्ता बंद करून तारेचे कुंपण टाकले आहे. शेतकर्‍यांना आपल्या शेतातील ऊस काढण्यासाठी रस्ताच उरला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांचा ऊस शेतातच राहून देण्याचा घाट बांधला की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्लॉटिंगधारकांना कारवाईची भीती वाटत नाही. म्हणून अशा प्रकारांना बळ मिळत आहे. शेतकर्‍यांना रस्ता मिळावा यासाठी शासन पातळीवर आदेश संबंधित विभागांना देण्यात आले असताना एकीकडे वाहिवाटीचा रस्ता बंद केला आहे. त्यामुळे येथील शेतकर्‍यांना रस्त्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

गेल्या दीड वर्षापासून अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेला रस्ता खुला होणार का? शेतकर्‍यांना शेतातील शेतमाल काढता येणार का? महसूल विभागाच्या अधिकार्‍यांची भूमिका काय असणार, शेतकर्‍यांना न्याय मिळवून देणार, की गब्बर प्लॉटिंगधारकाला तारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेतकर्‍यांचा प्रमुख विषय रस्ता आहे. प्लॉटिंगधारकाने रस्त्यावरच अतिक्रमण केले असून पूर्ण रस्ताच बंद केला आहे. हा रस्ता बंद झाल्याने शेतकर्‍यांना आपल्या शेताकडे कसे जायचे, असा प्रश्न शेतकर्‍यांसमोर सध्या उभा राहिला आहे.

पावसाळ्यात जर रस्ताच नसेल तर पिके काढायची कशी, असा प्रश्न पडला आहे. सध्या जमीन खरेदी-विक्रीचे वाढलेले भाव यामुळे इंचही जमीन शेतकरी फुकट कोणाला देत नाही. या परिसरात गुंठ्याचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे पूर्वीचे रस्ते आज दिसेनासे झाले. पिढ्यानपिढ्या रस्त्याने जाणारे शेतकरी आता कुठून जाणार, तसेच हे रस्ते पूर्वीप्रमाणे कायम असावेत, अशीही मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Back to top button