सिंहगड रस्त्यावर आता भुयारी मार्ग शक्य नाही; महापालिका प्रशासनाने केले स्पष्ट | पुढारी

सिंहगड रस्त्यावर आता भुयारी मार्ग शक्य नाही; महापालिका प्रशासनाने केले स्पष्ट

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सिंहगड रस्त्यावरील नियोजित उड्डाणपुलामुळे वडगाव येथील नागरिकांची अडचण होणार आहे. त्यामुळे भुयारी मार्ग (ग्रेड सेफरेटर) करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, उड्डाणपुलाचे काम 25 टक्के झाल्याने आता भुयारी मार्ग करणे शक्य नसल्याचे स्पष्टीकरण महापालिका प्रशासनाने पालकमंत्र्यांच्या बैठकीत दिले आहे.

सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलासंदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शुक्रवारी बैठक झाली. या वेळी आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, पालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, प्रकल्प अभियंता श्रीनिवास बोनाला आदी उपस्थित होते. सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल बांधताना स्थानिक नागरिकांना अडचणी येत आहेत. हा उड्डाणपूल झाल्यानंतरही अडचणी होणार आहेत. त्यामुळे वडगाव येथे एक भुयारी मार्ग करावा, अशी मागणी आमदार तापकीर यांनी केली.

मात्र, सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे काम 25 टक्के झाले आहे. त्यामुळे आता येथे भुयारी मार्ग करणे अशक्य असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले. त्यानंतर त्रयस्थ सल्लागार नेमून भुयारी मार्ग करता येईल का, याची शक्यता पडताळण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, यादृष्टीने आराखड्यात काही बदल करावयाचा झाल्यास अधिकचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. उड्डाणपूल बांधताना पर्यायी रस्ते नागरिकांना उपलब्ध होतील, याकडे लक्ष देऊन त्याठिकाणी असणारी खाऊ गल्ली, अतिक्रमण काढण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी या वेळी केल्या.

तापकीर-मिसाळ यांच्यात वाद
सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल करताना तेथे एक भुयारी मार्ग करावा, अशी मागणी भाजपचे आमदार भीमराव तापकीर यांनी केली. त्यावर आता भुयारी मार्ग करणे शक्य नाही, असे पालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले, तरीही तापकीर यांनी भुयारी मार्गाची जोरदार मागणी केली. त्यावर हा उड्डाणपूल मी आणला आहे. या उड्डाणपुलाचे सादरीकरण केले, त्या वेळी भुयारी मार्गाची मागणी का केली नाही, असा सवाल भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी केला. त्यावरून या दोन्ही आमदारांमध्ये वाद झाला. या वादावर पालकमंत्र्यांनी लगेच पडदा टाकला.

Back to top button