पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या तरुणीवर विवाहाच्या आमिषाने अत्याचार | पुढारी

पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या तरुणीवर विवाहाच्या आमिषाने अत्याचार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या तरुणीवर विवाहाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी एकाला चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याने एका नोकरीविषयक अ‍ॅपच्या माध्यमातून तरुणीशी ओळख करत तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले होते. त्यानंतर तिच्यासोबत हे कृत्य केले. सोमनाथ संभाजी कोदरे (38 , रा. मातोश्री बिल्डींग, केशवनगर, मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका 24 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी स्पर्धा परीक्षेची तयारी करते. तरुणी सदाशिव पेठेत एका सदनिकेत भाडेतत्वावर राहायला आहे. काही दिवसांपूर्वी तरुणीने एका अ‍ॅपच्या माध्यमातून नोकरीविषयक अर्ज केला होता. या अ‍ॅपच्या माध्यमातून पीडित तरुणीची आरोपीशी ओळख झाली. कोदरेचे दोन विवाह झाले आहेत. यातील एका पत्नीने त्याच्याविरुध्द तक्रार दाखल केली आहे, तर दुसरी पत्नी त्याच्यासोबत राहाते. त्याने पीडितेला अ‍ॅपवर ओळख झाल्यावर प्रेमाच्या जाळ्यात ओढले.

तसेच तिला स्वत:चे हॉटेल असल्याचे सांगितले होते. यानंतर ओळख वाढवत विवाहाच्या आमिषाने पीडितेवर बलात्कार केला. तरुणी त्याला सतत घरच्यांची किंवा जवळच्या व्यक्तींची ओळख करू देऊन विवाहाबाबत बोलण्यास सांगत होती. मात्र तो नेहमीच टाळाटाळ करत होता. संशय आल्याने तरुणीने इतरांकडे चौकशी केली तेव्हा त्याचे खरे रूप समोर आले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित तरुणीने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिस उपनिरीक्षक मुळूक तपास करत आहेत.

Back to top button