सोमेश्वरनगर : कोपीवरच्या विद्यार्थ्यांशी शिक्षणाधिकार्‍यांचा संवाद | पुढारी

सोमेश्वरनगर : कोपीवरच्या विद्यार्थ्यांशी शिक्षणाधिकार्‍यांचा संवाद

सोमेश्वरनगर; पुढारी वृत्तसेवा : ऊसतोड मजुराचे प्रत्येक मूल शाळेत गेले पाहिजे यासाठी राज्य सरकारने मोहीम सुरू केली आहे. सोमेश्वर कारखान्याने पुढाकार घेऊन या मुलांच्या शिक्षणासाठी कोपीवरची शाळा हा अभ्यासवर्ग चालवून अत्यंत उल्लेखनीय काम केले आहे. सर्व कारखान्यांनी अशा प्रकारे शिक्षण विभागास मदत करावी आणि शिक्षक व पर्यवेक्षीय यंत्रणेनेही अशा प्रकारचे काम उभे करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी केले.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून राज्यातील पहिला मकोपीवरची शाळाफ उपक्रम चालविला जातो. या माध्यमातून मुले ऊसतोड फडातून सायंकाळी परतल्यावर सायंकाळी पाच ते नऊ या वेळेत शिक्षक-कार्यकर्त्यांकडून अभ्यासवर्ग चालवला जातो. कारखाना कार्यस्थळावर एकूण 362 मुले आणि त्यापैकी 6 ते 14 वयोगटाची 169 मुले आढळली आहेत.

सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव व संचालक मंडळाच्या पाठिंब्यातून मागील वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे. या अभ्यासवर्गास गायकवाड यांनी नुकतीच भेट दिली. शिक्षक-कार्यकर्त्यांचे त्यांनी कामाबद्दल कौतुक केले.

कारखान्याचे संचालक ऋषी गायकवाड, शिक्षण संस्थेचे सचिव भारत खोमणे यांचा त्यांनी या उपक्रमाबाबत सत्कारही केला. याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी नीलेश धानापुणे, केंद्रप्रमुख नवनाथ ओमासे, मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी संदीप जगताप, शेतकी अधिकारी बापूराव गायकवाड, संजय वाबळे, कल्याण जगताप आदी उपस्थित होते. याप्रसंगी प्रकल्पाचे समन्वयक संतोष शेंडकर यांनी उपक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली. अलका रसाळ यांनी आभार मानले.

दहावीच्या दोन विद्यार्थ्यांची घेतली जबाबदारी
जिल्हा परिषद शाळा सोमेश्वरनगर येथे गायकवाड यांनी ऊसतोड मजुरांच्या 200 मुलांशी गप्पा मारत त्यांना बोलते केले. मुलांच्या शालेय प्रगतीबाबतही चाचपणी केली. यानंतर त्यांनी स्वतः दीड ते दोन तास मजुरांच्या कोप्यांवर जाऊन पालक व विद्यार्थ्यांशी रात्रीच्या वेळी संवाद साधला. ऊसतोडीसाठी आलेल्या दहावीच्या मोनिका शिंदे, अविनाश पवळ या दोन मुलांशी संवाद साधून त्यांना नजीकच्या विद्यालयात बसविण्याची आणि परीक्षेला मूळ गावी पाठविण्याची सोय केली. नौशाद बागवान घेत असलेल्या अभ्यासवर्गास भेट देऊन मुलांचे अक्षरलेखन, वाचन याची माहिती घेतली.

दरवर्षी सहा महिने शिक्षणात खंड पडत असल्याने मुलांना अभ्यासात गती कमी होते. अभ्यासात कमी पडली की त्यांनाही शाळेत जावेसे वाटत नाही. मूळ गावी उत्तम दर्जाचे वसतिगृह होणे हाच उपाय ठरू शकेल.
                                   संध्या गायकवाड, शिक्षणाधिकारी, पुणे जिल्हा परिषद

Back to top button