मंचर : समजावण्यासाठी गेलेल्या माहेरच्या मंडळींना मारहाण | पुढारी

मंचर : समजावण्यासाठी गेलेल्या माहेरच्या मंडळींना मारहाण

मंचर; पुढारी वृत्तसेवा : मुलीला सासरची मंडळी त्रास देतात म्हणून त्यांना समजावण्यासाठी गेलेल्या माहेरच्या मंडळींना चौघांनी मारहाण केल्याची घटना पारगाव (भीमाशंकर साखर कारखान्याशेजारी) येथे घडली. याबाबत देवराम गंगाराम मोरे (रा. वडगाव आनंद, मोरदरा, ता. जुन्नर) यांनी पारगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत पारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी देवराम मोरे यांची मुलगी प्रमिला हिचा विवाह स्वप्निल दिलीप चव्हाण (रा. पारगाव, भीमाशंकर कारखान्याच्या शेजारी, ता. आंबेगाव) याच्याशी झाला आहे. सासरचे लोक त्रास करतात असे मुलगी प्रमिला हिने तिच्या मावशीला फोन करून सांगितले होते. मुलीला त्रास देत असल्याने मुलीचे वडील, मुलीचे माहेरचे नातेवाईक लीला शितोळे, लक्ष्मण मुसुडगे, पार्वताबाई शितोळे, ठकूबाई मुसुडगे ही मंडळी मुलीला भेटण्यासाठी गेले.

यावेळी ते मुलीच्या घरच्यांना समजावून सांगत असताना विहीन आशाबाई दिलीप चव्हाण, जावई स्वप्निल दिलीप चव्हाण, त्याचा भाऊ पवन दिलीप चव्हाण, गजानन नारायण माने यांनी फिर्यादी व त्यांच्याबरोबर असलेल्या पाहुण्यांना शिवीगाळ केली. त्यावेळी आशाबाई चव्हाण हिने तेथे पडलेला दगड उचलून लीला शितोळे हिला मारला. तसेच ठकूबाई मुसुडगे हिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

गजानन माने यांनी लक्ष्मण मुसुडगे याला दगडाने मारहाण केली, तसेच स्वप्निल चव्हाण यांनी दगड उचलून पाहुण्यांनी आणलेल्या मॅक्झिमो गाडीची काच फोडून नुकसान केले आहे. याप्रकरणी आशाबाई दिलीप चव्हाण, स्वप्निल दिलीप चव्हाण, पवन दिलीप चव्हाण, गजानन नारायण माने (सर्व रा. पारगाव, ता. आंबेगाव) यांच्यावर पारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पारगाव पोलिस करीत आहेत.

Back to top button