भोरला पिण्याच्या पाण्यात सापडल्या अळ्या | पुढारी

भोरला पिण्याच्या पाण्यात सापडल्या अळ्या

भोर; पुढारी वृत्तसेवा : शहराच्या काही भागांत पिण्याच्या पाण्यात अळ्या सापडल्या आहेत. काही ठिकाणी पाण्याला पावडरचा वास येत आहे. दूषित पाणीपुरवठ्यामुळे अनेकांना जुलाब, उलट्याचा त्रास होत आहे. यामुळे भोर नगरपरिषदेकडून जलशुध्दीकरण प्रकल्पाची साफसफाई करण्यात आली. वाघजाईनगर आणि पीराचा मळा परिसरात पिण्याच्या पाण्यात अळ्या सापडल्या. यामुळे नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर नगरपालिकेला जाग आली.

मागील दोन दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. त्यामुळे अनेकांना जुलाब, उलट्यांचा त्रास होत आहे. शहरातील वाघजाईनगर आणि पीराचा मळा परिसरातील नागरिकांनी ही बाब निदर्शनास आल्यावर नगरपरिषद प्रशासनाने जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करून जलशुद्धीकरण केंद्र स्वच्छ केले तसेच औषधफवारणीची सूचना देण्यात आली.

भोर शहरातील काही भागांत पाण्यात अळ्या सापडल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिल्यावर जलशुध्दीकरण प्रकल्प साफ केला आहे. स्वच्छ पाणीपुरवठा केला जात आहे.
                                                                          हेमंत किरुळकर,
                                                              मुख्यधिकारी, भोर नगरपरिषद

Back to top button