पुणे : उधारीचे पैसे मागितल्याने तरुणावर खुनी हल्ला | पुढारी

पुणे : उधारीचे पैसे मागितल्याने तरुणावर खुनी हल्ला

पुणे; पुढारी वृत्तसेवा : उधारीचे पैसे मागितल्याच्या कारणातून चौघांनी एका तरुणावर कोयता, चाकूने खुनी हल्ला केला. या वेळी भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या दुसर्‍या एका तरुणाच्या डोक्यात फरशीचा तुकडा मारून त्याला देखील गंभीर जखमी केले. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी मुकेश शिवाजी इंगळे (वय 45, रा. संतोषनगर, कात्रज) याला अटक केली आहे.

तर इतर तीन जणांसह चौघांच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये एका विधीसंघर्षीत बालकाचा समावेश आहे. ही घटना गुरुवारी रात्री सव्वाबारा वाजेच्या सुमारास तीन हत्ती चौक धनकवडी येथील सार्वजनिक रस्त्यावर घडली. याबाबत विनोद जंगम (वय 24, रा. तळजाई पठार) याने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जंगम यांनी त्यांचा गाळा आरोपींना हॉटलेसाठी भाड्याने दिला होता. त्याचे भाडे आरोपींकडे थकलेले होते. गुरुवारी फिर्यादी हा तीन हत्ती चौक परिसरात थांबला होता. त्या वेळी आरोपी तेथे आला. फिर्यादींनी आरोपीकडे गाळ्याच्या भाड्याचे उधार असलेले पैसे मागितले. त्या वेळी आरोपींनी आमच्याकडे पैसे मागतो काय, आज तुला संपवूनच टाकतो असे म्हणून त्यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी रॉड त्यांच्या डोक्यात मारला. दरम्यान प्रसंगावधान राखत फिर्यादीने तो वार चुकविण्यासाठी डावा हात पुढे केला. त्यामध्ये त्यांच्या पंजाला गंभीर दुखापत झाली.

तसेच चाकूने देखील आरोपींनी फिर्यादीच्या पाठीत वार केला. त्यानंतर कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली. तर महिला आरोपीने फिर्यादींचा गळा दाबला. हा सर्व प्रकार सुरू असताना फिर्यादींचा एक मित्र वाद सोडविण्यासठी तेथे आला. त्याच्या डोक्यात देखील आरोपीने फरशीचा तुकडा मारून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. हा प्रकार घडल्यानंतर फिर्यादीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

Back to top button