पुणे : स्टेशनवर प्रवाशांची आता जिने चढण्यातून सुटका | पुढारी

पुणे : स्टेशनवर प्रवाशांची आता जिने चढण्यातून सुटका

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे रेल्वेस्थानकावर प्रवाशांना आता अवजड बॅगा घेऊन जिने चढावे लागणार नाहीत. कारण, आता लवकरच पुणे रेल्वेस्थानकावर 5 लिफ्ट आणि एक सरकता रॅम्प बसविण्यात येणार आहे. रेल्वेच्या पुणे विभागाच्या व्यवस्थापकपदाचा पदभार इंदुराणी दुबे यांनी नुकताच स्वीकारला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर दुबे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधला.

या वेळी रेल्वेच्या पुणे विभागाचे अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक ब्रजेशकुमार सिंग, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय अभियंता पीयूष चतुर्वेदी, वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता विजयसिंह दडस, वरिष्ठ मंडळ परिचालन प्रबंधक डॉ. स्वप्निल नीला, वरिष्ठ रेल्वे सुरक्षा आयुक्त उदयसिंग पवार, पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर आदी उपस्थित होते.

या समस्या सोडविणार…
हडपसर टर्मिनलच्या डेव्हलपमेंटसाठी आर्किटेक्टची नेमणूक करणार
पुणे-दानापूर गाड्या वाढविण्यासाठी प्रयत्न करणार
पुणे विभागातील 18 स्थानकांवर सीसीटीव्ही बसविणार
पुणे रेल्वेस्थानकावर 5 लिफ्ट आणि एक रॅम्प बसविणार
रेल्वेस्थानक परिसरातील अनधिकृत शोरूम हटविणार
दुपारच्या वेळेत लोकलच्या फेर्‍या वाढविणार
पुणे-मुंबईदरम्यान धावणार्‍या गाड्यांचे डबे वाढविण्यासाठी प्रयत्न करणार
पुणे रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासाचे काम हाती घेणार
पुणे रेल्वेस्थानकातील पार्किंगचा गोंधळ सोडविणार
पार्सल सेवेचा वेग वाढविणार

पुणे विभागात रेल्वेचे प्रवासी वाढविण्यासोबतच पुणे रेल्वेस्थानकावरील पायाभूत सुविधा वाढविण्यावर भर देणार आहे. त्यासोबतच प्रवाशांच्या सुरक्षिततेचाही या वेळी प्राधान्याने विचार करण्यात येणार आहे.
                                      – इंदुराणी दुबे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक
                                                              (डीआरएम), रेल्वे पुणे विभाग

Back to top button