पुणे : कारगिलमधील माध्यमांना सुविधांची आवश्यकता : हुसेन खलू यांचे मत | पुढारी

पुणे : कारगिलमधील माध्यमांना सुविधांची आवश्यकता : हुसेन खलू यांचे मत

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कठीण परिस्थितीतही आम्ही लडाखमधील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करतो. कारगिल युद्धानंतर येथील परिस्थितीमध्ये काही प्रमाणात सुधारणा झाल्या असल्या, तरीही माध्यमांना अत्याधुनिक सोयी, सुविधांची गरज आहे. त्या उपलब्ध झाल्यास लोकांचे प्रश्न अधिक तीव्रतेने मांडण्याचे काम आम्ही नक्की करू, असे मत लडाख प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहम्मद हुसेन खलू यांनी व्यक्त केले.

लडाख येथील कारगिल युद्धात सहभागी झालेल्या काही पत्रकारांशी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने वार्तालाप कार्यक्रमाचे शुक्रवारी (दि. 2) आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष स्वप्निल बापट यांच्या हस्ते उपस्थित कारगिल येथील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी खलू, लडाखच्या माहिती विभागाच्या सहायक संचालक पद्मा अन्मो, ’व्हॉइस ऑफ लडाख’चे संपादक सईद हाशिम रिझवी, दूरदर्शन लेहचे पत्रकार मन्सूर अहमद, रणगुल कारगिलचे प्रतिनिधी मोहम्मद इब्राहिम, ’नेटवर्क 18’चे प्रतिनिधी गुलाम नबी झिया, ’गुलिस्तान न्यूज लडाख’चे मोहम्मद इश्क, एस टीव्हीचे संपादक नासीर हुसेन, ’आरएनयू एअर कारगिल’चे रिपोर्टर अनयात अली शोतयाप, ’डीआयपीआर कारगिल’चे प्रतिनिधी मुर्तझा फाझीली, सरचिटणीस पांडुरंग सरोदे उपस्थित होते.

खलू म्हणाले, ’महाराष्ट्र, पुणे लडाखचे अगोदरपासूनच संबंध आहेत. कारण फार पूर्वीपासून पुण्यातील पर्यटक लडाख, कारगिलमध्ये येत आहेत. त्यांच्याशी भेट कायम होत असते. पर्यटन, व्यवसाय, वाहतूक, शिक्षण आणि परंपरा यांचा विचार केला तर पुणे- कारगिलचे खूप जुने नाते आहे.’ 370 कलम हटविल्याबाबतच्या विषयावर खलू म्हणाले, ’हे कलम हटविल्यामुळे आमच्या पत्रकारितेवर कोणताही फरक पडलेला नाही. पूर्वी जशी आम्ही पत्रकारिता करायचो, तशीच पत्रकारिता आत्ताही आमची सुरू आहे.’

’व्हॉइस ऑफ लडाख’चे संपादक सईद हाशीम रिझवी म्हणाले, ’पुणे श्रमिक पत्रकार संघाने आम्हाला येथे बोलावून आमचा सन्मान केला, त्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत. दूरदर्शन लेहचे पत्रकार मन्सूर अहमद म्हणाले, ’लडाखची लोकसंख्या 3 लाखांपेक्षा अधिक आहे. आम्हाला पत्रकारिता करताना खूप स्वातंत्र्य आहे. कोणतेही बंधन नाही. आम्ही कोणत्याही वरिष्ठ दर्जाच्या अधिकार्‍याला थेट प्रश्न विचारू शकतो. कारगिल, लडाखमध्ये तब्बल 40 टक्के महिला पत्रकार विविध माध्यमांत कार्यरत आहेत. त्यादेखील न घाबरता बिनधास्तपणे पत्रकारिता करत आहेत.’

Back to top button