तळेगाव ढमढेरे : पेट्रोल पंपांवरील सुविधांपासून ग्राहक वंचित | पुढारी

तळेगाव ढमढेरे : पेट्रोल पंपांवरील सुविधांपासून ग्राहक वंचित

तळेगाव ढमढेरे; पुढारी वृत्तसेवा : ग्रामीण भागातील पेट्रोल पंपचालक नागरिकांना सुविधा पुरवण्यास अयशस्वी ठरले आहेत. यामुळे नागरिकांना सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे. ग्रामीण भागातील पेट्रोल आणि डिझेल ग्राहकांना मोफत फोन सेवा, हवा, स्वच्छ पाणी, स्वच्छतागृह, प्रथमोपचार आदी गोष्टींपासून वंचित राहावे लागत आहे. यासाठी संबंधित अधिकार्‍यांनी या पेट्रोल पंपचालकांची तपासणी करण्याची गरज आहे. ज्या सुविधांसाठी आपण पैसे देतो त्या सुविधा खरेतर आपल्याला मोफत उपलब्ध करवून देणे हे पेट्रोल पंपचालकांची जबाबदारी असते आणि त्या अधिकारांपासून ते आपल्याला वंचित ठेवू शकत नाहीत. त्यामुळेच अशा असुविधेमुळे ग्राहकांची फसवणूक होते.

आपत्कालीन स्थितीमध्ये तुम्ही पेट्रोल पंपाहून फोन कॉल करू शकता. तशी सुविधा तिथे उपलब्ध असते. ग्राहकाच्या गाडीच्या टायरमध्ये हवा भरायला किंवा नायट्रोजन भरायला पेट्रोल पंपावर विनामूल्य सुविधा देण्याचा कायदा आहे. ही सुविधा पंपाच्या बाजूला धूळखात पडली आहे. त्याठिकाणी टायर खोल फिटिंग करणार्‍या व्यावसायकाला भाड्याने दिले जाते. गाडीतील हवा तपासायची असल्यास त्याला वेगळे पैसे द्यावे लागतात. ग्राहकांसाठी पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छतागृहाची व्यवस्था पेट्रोल पंपावर असणे आवश्यक आहे. बहुतांश ठिकाणी या व्यवस्था आढळून येत नाहीत.

ग्रामीण भागातील रस्त्यावर अपघात होतात. जखमींना प्रथमोपचार आणि प्राथमिक मेडिकल व्यवस्था पेट्रोल पंपावर असणे गरजेचे आहे, तसेच एक तक्रार पेटी असणेदेखील आवश्यक आहे. प्रत्येक ग्राहकाला पेट्रोल भरण्याआधी त्याची किंमत जाणून घेण्याचा अधिकार असतो. म्हणून प्रत्येक पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेलची किंमत मोठ्या अक्षरात लिहिलेली असते. प्रत्येक ग्राहकाला पेट्रोलच्या खरेदीनंतर बिल घेण्याचा अधिकार असतो. या सुविधेपासून ग्राहकाला वंचित ठेवणार्‍या पेट्रोल पंपचालकांवर संबंधित अधिकारी कारवाई करणार का, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.

इंधनाची क्वालिटी तपासण्याचा असतो अधिकार
प्रत्येक ग्राहकाला पेट्रोल आणि डिझेल क्वालिटी तपासून बघण्याचा अधिकार असतो. क्वालिटीविषयी काही संशय असेल तर तुम्ही त्यावर फिल्टर पेपर टेस्ट करू शकता. मात्र, या नियमाला सर्वच पेट्रोल पंपांवर हरताळ फासण्यात येत आहे.

Back to top button