शिक्षणमंत्र्यांनी शिक्रापुरात येऊन फिरवली वाबळेवाडीकडे पाठ | पुढारी

शिक्षणमंत्र्यांनी शिक्रापुरात येऊन फिरवली वाबळेवाडीकडे पाठ

शिक्रापूर; पुढारी वृत्तसेवा : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील बहुचर्चित आंतरराष्ट्रीय दर्जा मिळालेली वाबळेवाडी शाळा तत्कालीन प्रभारी मुख्याध्यापकावरील आरोपामुळे चर्चेत असताना गावातील अनेक पदाधिकार्‍यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेतली होती. या वेळी वाबळेवाडी शाळेला भेट देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, शिक्षणमंत्री केसरकर हे बुधवारी (दि. 30) शिक्रापूर येथे आले. परंतु, त्यांनी वाबळेवाडी शाळेकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. शिक्षणमंत्री यांनी शिक्रापूर येथे येऊन देखील त्यांनी शाळेला भेट न दिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

सत्ताबदल झाल्यानंतर काही स्थानिक नेत्यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या माध्यमातून नुकतीच शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची मुंबई येथील रामटेक बंगला येथे भेट घेतली होती. त्या वेळी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी गावातील पदाधिकार्‍यांची विकासकामांसाठी तसेच वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेबाबत चर्चा झाली. त्या वेळी त्यांनी लवकरच वाबळेवाडी शाळेला आपण भेट देणार असल्याचे सांगितले होते.

नुकतेच शिरूर तालुक्यातील एका कार्यक्रमासाठी शिक्षणमंत्री दीपक केसरकर आले असता ते शिक्रापूरमध्ये शिवसेना पदाधिकार्‍यांना भेटले, तसेच शिवसेनेच्या शिरूर तालुका पदाधिकार्‍यांसह वाहनातून गेले. मात्र, त्यांनी शिक्रापूरमध्ये येऊन देखील वाबळेवाडी शाळेकडे पाठ फिरविल्याने शिक्षणमंत्र्यांनी वाबळेवाडी शाळेकडे पाठ फिरवल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. शिक्षणमंत्री केसरकर हे खासगी कार्यक्रमासाठी तालुक्यामध्ये आले होते. वाबळेवाडीच्या विषयावर ते स्वतंत्र वेळ देणार असल्याचे बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल काशीद यांनी सांगितले.

Back to top button