कोरेगाव भीमात चोरट्यांचा दागिन्यांवर डल्ला | पुढारी

कोरेगाव भीमात चोरट्यांचा दागिन्यांवर डल्ला

कोरेगाव भीमा; पुढारी वृत्तसेवा : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील एक कुटुंब लग्नासाठी बाहेरगावी गेलेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम चोरून नेली. याप्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोरेगाव भीमा येथील फडतरे वस्ती येथे राहणारे उत्तम भोकरे हे घराला कुलूप लावून त्यांच्या कुटुंबीयांसह बारामती येथे नातेवाइकांच्या लग्नासाठी गेलेले होते. सकाळच्या सुमारास शेजारील नागरिक उठले असता भोकरे यांच्या घराचे कुलूप तुटलेले व घरातील लाईट सुरू असल्याचे दिसले. त्यामुळे शेजारच्यांनी याबाबतची माहिती भोकरे यांना दिली.

दरम्यान भोकरे यांनी घरी येत घरातील पाहणी केली असता सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले तसेच कपाट उघडे दिसून आले. त्यांनी पाहणी केली असता चोरट्यांनी घरातील तीन तोळे सोन्याचे दागिने, काही चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा अंदाजे 1 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे दिसून आले. याबाबत उत्तम केरू भोकरे (वय 65, रा. फडतरे वस्ती, कोरेगाव भीमा) यांनी शिक्रापूर पोलिस ठाणे येथे फिर्याद दिली. तपास सहायक पोलिस निरीक्षक वैभव पवार करीत आहेत.

Back to top button