हिंजवडी : माथेफिरूंनी लावलेली आग प्रशासनाने विझवली | पुढारी

हिंजवडी : माथेफिरूंनी लावलेली आग प्रशासनाने विझवली

हिंजवडी : माण (ता. मुळशी) द क्लिफ गार्डन सोसायटीच्या आवारातील एका बंद केलेल्या डंपिंग ग्राऊंडवर अज्ञातांनी आग लावली होती. अचानक लागलेल्या या आगीची माहिती मिळताच ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थांनी मिळून ही आग विझवली. वेळीच आग विझवण्याची कार्यवाही करण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला आहे. या वेळी ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी यांसोबतच मुळशीचे गटविकास अधिकारी संदीप जठार यांनीदेखील घटनास्थळी कार्यवाहीत अग्रेसर भूमिका घेतली.

द क्लिफ गार्डन सोसायटीच्यावर डोंगरात असलेल्या डंपिंग ग्राऊंडवर ही घटना घडली. कोणत्या तरी समाज कंटकांनीच येथे वेगवेगळ्या 4-5 ठिकाणी ही आग लावल्याची माहिती उपस्थितांकडून मिळाली आहे. घटनास्थळी 3 जेसीबी, एमआयडीसीच्या अग्निशमन दलाच्या 2 गाडया व 2 पाण्याचे टँकर यांच्यामुळे आगीला विझवण्यात यश आले आहे. याबाबतीत संबंधित परिसरातील सोसायटीच्या पदाधिकार्‍यांना योग्य त्या सूचना देऊन समाज कंटकांचा बंदोबस्त करण्याचे सांगण्यात आले आहे.

माण ग्रामपंचायतने हे डंपिंग ग्राऊंड फार पूर्वीच बंद केले असून, गावामध्ये कचराप्रक्रिया प्रकल्प सुरू केला आहे. तर या बंद केलेल्या कचरा डंपिंग ग्राऊंडची योग्य विल्हेवाट लावत लवकरच टेंडर काढणार असून निसर्गाची झालेली हानीदेखील भरून काढली जाणार आहे.
या वेळी या कार्यवाहीसाठी पुणे जिल्हा परिषदेचे स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद टोणपे, मुळशी तालुक्याचे गटविकास अधिकारी संदीप जठार, ग्रामविकास अधिकारी मदन शेलार, सरपंच अर्चना आढाव, ग्रामपंचायत सदस्य पंडित गवारे, प्रदीप पारखी, प्रशांत पारखी, विजय भोसले, शुभांगी भोसले, अरुणा लोखंडे, सचिन आढाव तसेच द क्लिफ सोसायटीचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी माण ग्रामपंचायतच्या वतीने उपस्थितांचे आभार मानण्यात आले.

Back to top button