पिंपरी : उद्घाटनाच्या प्रतीक्षेत ’तारांगण’ | पुढारी

पिंपरी : उद्घाटनाच्या प्रतीक्षेत ’तारांगण’

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  विज्ञान आणि खगोलशास्त्रविषयक माहिती एकाच जागेत विद्यार्थी आणि नागरिकांना उपलब्ध व्हावी, यासाठी संपूर्ण देशातील चार तारांगणांपैकी एक असलेल्या तारांगणाची उभारणी पिंपरी चिंचवड महापालिकेने केली आहे. सध्या तारांगणाचे काम पूर्ण झाले असून, फक्त उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.

150 जणांची बैठक व्यवस्था

मुंबईतील नेहरू तारांगणाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडच्या सायन्स पार्कमध्ये ऑप्टो- मेकॅनिकल आणि 2 डी डिजिटल तारांगण प्रणाली असलेल्या हायब—ीड कॉन्फिगरेशन सिस्टम प्रकारचे तारांगण उभारले आहे. यात 150 जणांची बैठक व्यवस्था आहे. हे तारांगण उभारण्यास फक्त एक ते दीड वर्षाचा कालावधी लागणार होता. तारांगणाचे काम 2018 साली सुरू झाले. तारांगणाच्या वरच्या बाजूस सुसज्ज असा 15 मीटरचा डोम (घुमट) आहे. मात्र, डोमच्या आतील वापरण्यात येणारी सामग्री जपानमध्ये तयार करण्याचे काम सुरू होते. त्यामुळे डोमच्या आतील भाग तयार करून भारतात आणण्यासाठी वेळ लागला. त्यामुळे नियोजित वेळेपेक्षा दोन महिने अधिकचा वेळ या कामासाठी लागला.

कोरोनाचा कामाला खोडा

कोरोनाकाळात दोन वर्षे काम पूर्णपणे बंद होते. कारण तारांगणातील तांत्रिक बाबीचे काम करण्यासाठी विदेशातील इंजिनिअर्स बोलाविण्यात आले होते. सर्व प्रोजेक्टर व साऊंड सिस्टिम आदी बसविण्यासाठी परदेशी लोकांची टीम शहरात दाखल झाली होती. सर्व यंत्रणा बसविण्याचे काम शेवटच्या टप्प्यात आले होते. कोरोना भारतात येण्यापूर्वी इतर देशात त्याचे प्रमाण वाढले होते. सरतेशवेटी मार्च महिन्यामध्ये संपूर्ण भारतात लॉकडाऊन झाले. त्यामुळे परदेशी नागरिकांना परत जावे लागले.

तीन वेळा मुदतवाढ

त्यानंतर अनलॉक काळातदेखील विदेशातील इंजिनिअर्सला शहरात यायला उशीर लागला आणि तारांगणाचे काम लांबणीवर पडले. तारांगणास तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. 31 मे 2020 रोजी पहिली मुदतवाढ देण्यात आले. त्यानंतर 31 डिसेंबर रोजी दुसरी तर अंतिम मुदतवाढ ही 15 जुलै 2022 पर्यंत होती.

काय असणार या तारांगणामध्ये?

शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षक व विद्यार्थी यांना खगोल शास्त्राची माहिती मिळावी, याकरिता तसेच आकाशगंगा, पृथ्वीवरील वातावरण, वातावरणातील बदल, आकाशातील ग्रह, तारे, नक्षत्र, ग्रहण आदी विषयी माहिती मिळणार आहे.
या हेतूने पुणे जिल्ह्यामध्ये प्रथमच हा प्रकल्प राबविण्यात आला आहे. तारांगणामध्ये सात प्रोजेक्ट आहेत. तारांगणांचे बाहेरचे डोम काचेचे आणि आतील अल्युमिनियमचे बनविण्यात आले आहे.
तारांगणाचा एकूण खर्च 11 कोटी 12 लाख 43 हजार इतका आहे. याबाबत आयुक्त शेखर सिंह यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.

Back to top button