मंचर : गोविंद खिलारींचा बैलगाडा ठरला घाटाचा राजा | पुढारी

मंचर : गोविंद खिलारींचा बैलगाडा ठरला घाटाचा राजा

मंचर; पुढारी वृत्तसेवा : खडकी (ता. आंबेगाव) येथे मुक्तादेवी यात्रोत्सवानिमित्त गुरुवारी (दि. 1) झालेल्या बैलगाडा शर्यतीत माजी सरपंच गोविंद खिलारी यांचा बैलगाडा घाटाचा राजा किताबाचा मानकरी ठरला. यात्रा कमिटीचे संयोजक आणि भीमाशंकर कारखान्याचे संचालक दादाभाऊ पोखरकर यांनी ही माहिती दिली. लंपी आजाराचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर प्रशासनाने बैलगाडा शर्यतीला परवानगी दिली असून प्रथमच खडकी येथे शर्यतीचा थरार रंगला.

मुक्तादेवी यात्रोत्सवानिमित्त आयोजित बैलगाडा शर्यतीत रविवार (दि.4) पर्यंत होणार्‍या बैलगाडा शर्यतीत तब्बल 815 बैलगाडा मालकांनी नोंदणी केली आहे. शर्यतीच्या पहिल्या दिवशी जिजाबा वाघमारे, सगाजी पाटील व सरपंच नारायण बांगर यांच्या हस्ते शर्यतीच्या घाटाचे उद्घाटन झाले. प्रथम क्रमांकात खेड येथील अजिंक्य खांडेभराड यांचा बैलगाडा फळीफोड ठरला.

द्वितीय क्रमांकात सावरगाव येथील शिवाजीराजे चिकणे,तर तृतीय क्रमांकात गुंडाळवाडी येथील संतोष भोर यांचे बैलगाडे फळीफोड ठरले. घाटाचा राजा हा किताब गोविंद खिलारी यांच्या बैलगाड्याने पटकावला. राहुल जाधव,भाजप संपर्कप्रमुख जयसिंग एरंडे,भीमाशंकर कारखान्याचे संचालक अंकित जाधव आदींनी यात्रेला भेट दिली. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील याचे स्वीय सहायक भिवसेन भोर आदींनी व्यवस्था पाहिली.

Back to top button