बारामती : घरफोडीतील आरोपीस पोलिस कोठडी | पुढारी

बारामती : घरफोडीतील आरोपीस पोलिस कोठडी

बारामती; पुढारी वृत्तसेवा : शहरातील शक्ती चेंबर्स, चव्हाण चाळ येथे घरफोडी करत रोख रकमेसह दागिने अशा 1 लाख 21 हजारांची चोरी करणार्‍या सचिन राजू जवारे (वय 36, रा. वडकेनगर, आमराई, बारामती) याला शहर पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात नीता प्रफुल्ल चव्हाण यांनी फिर्याद दिली होती. ही घटना मंगळवारी (दि. 29 नोव्हेंबर) रोजी रात्री दोन ते तीनच्या दरम्यान ही घटना घडली होती. जवारे याला बारामती न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली.

चोरट्याने दरवाजाची कडी काढत घरात प्रवेश केला. कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे व चांदीचे दागिने चोरून नेले. पहाटे तीनच्या सुमारास फिर्यादी सासूला पाणी देण्यासाठी उठल्या असता त्यांना कपाटाचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी कपाटाची पाहणी केली असता आठ हजार रुपयांच्या रोख रकमेसह गंठण, अंगठी, ब्रेसलेट, नथ, रिंगा, साखळी असा ऐवज चोरीला गेल्याचे दिसून आले.

उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलिस निरीक्षक सुनील महाडीक, सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश वाघमारे यांनी घटनास्थळी भेट दिली. रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेत जवारे याला ताब्यात घेण्यात आले. त्याची चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. चोरलेला मुद्देमाल पोलिसांना दिला. दागिने मिळाल्याने नीता चव्हाण यांनी पोलिसांचे आभार मानले.

Back to top button