पुणे : ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्चही लाखांत! | पुढारी

पुणे : ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्चही लाखांत!

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवाराच्या निवडणूक खर्चांच्या मर्यादेत नुकतीच वाढ केली आहे. प्रथमच ग्रामपंचायत सदस्य संख्येनुसार खर्च निश्चित करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने खर्चाची मर्यादा हजारामध्ये वाढवली असली तरी प्रत्यक्षात खर्च लाखोंच्या घरामध्ये जात असल्याची वस्तुस्थिती आहे.

सध्या जिल्ह्यातील 221 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतीसाठी निवडणूक खर्चात वाढ केली आहे. सर्वांत लहान ग्रामपंचायतीसाठी प्रत्येकी सदस्य 25 हजारांपासून सर्वांत मोठ्या ग्रामपंचायत सदस्यांसाठी प्रत्येकी 1 लाख 75 हजारांपर्यंत खर्चाची मर्यादा वाढविण्यात आली आहे.

आयोगाने खर्चाची मर्यादा वाढवली असली तरी गेल्या काही वर्षांत पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यातील ग्रामपंचायती वगळता बहुतेक सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत खर्चाची उड्डाणे लाखो, कोटींच्या घरात पोहचली आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील एमआयडीसी क्षेत्रातील ग्रामपंचायतींमध्ये तर सर्वसामान्य उमेदवारांच्या हाताबाहेर गेल्या आहेत. खेड, शिरूर तालुक्यातील एमआयडीसी क्षेत्रातील काही ग्रामपंचायतींमध्ये दीड-दोन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत राज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे खर्चांचे रेकॉर्ड मोडून काढले होते. सध्या होत असलेल्या निवडणुकीत याचीच पुनरावृत्ती होण्याची चिन्हे आहेत.

निवडणूक धनाढ्यांच्या हातात
ग्रामपंचायत निवडणूक धनाढ्य लोकांच्या हातात गेल्या आहेत. गेल्या काही वर्षांत खेड, शिरूर, मावळ तालुक्यातील एमआयडीसी क्षेत्रातील बहुतेक सर्वच ग्रामपंचायतीत हे चित्र आहे. लाखो, कोटी रुपये खर्चाची तयारी ठेवूनच उमेदवार निवडणुकीत उतरत आहेत. यामुळेच खरोखर काम करण्याची इच्छा असणारे, लोकांसाठी, गावाच्या विकासासाठी मनापासून काम करणारी सर्वसामान्य व्यक्तींचा अशा धनाढ्य लोकासमोर निभाव लागत नाही, असे पीएमआरडीए सदस्य वसंत भसे यांनी सांगितले.

खेड तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सदस्यांकडून मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. एमआयडीसी क्षेत्रातील ग्रामपंचायतीमध्ये हा खर्च 30 लाखांपासून तब्बल कोटींच्या घरामध्ये गेला आहे. तर सर्वसाधारण ग्रामपंचायत सदस्याचा खर्च 5 लाखापासून थेट 10-15 लाखांवर जाऊन पोहोचला आहे.
                                                                                 गणेश काळे,
                                                                       सदस्य कुरकुंडी ग्रामपंचायत

Back to top button