लोहगावात अतिक्रमणांवर कारवाई; हातगाड्या, स्टॉल, टपर्‍या हटविल्या | पुढारी

लोहगावात अतिक्रमणांवर कारवाई; हातगाड्या, स्टॉल, टपर्‍या हटविल्या

येरवडा; पुढारी वृत्तसेवा : लोहगाव चौकात अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या स्टॉलवर महापालिका प्रशासनाने कारवाई केली. यामुळे परिसराने मोकळा श्वास घेतला आहे. नगररोड-वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालय अतिक्रमण व आकाशचिन्ह विभागाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. यात लोहगाव चौक, बसस्टॉप, पोलिस चौकी परिसरातील स्टॉल, टपरी- हातगाड्या काढण्यात आल्या आहेत. त्यासाठी एअर फोर्स अधिकारी व पोलिस स्टेशनची मदत घेण्यात आली.

विभागीय निरीक्षक सुभाष तळेकर, अतिक्रमण निरीक्षक अनिल परदेशी, सुभाष जगताप व सहायक निरीक्षक, बिगारी वर्ग, तीन ट्रक आणि एका जेसीबीच्या साह्याने ही कारवाई करण्यात आली. विभागीय निरीक्षक सुभाष तळेकर म्हणाले की, लोहगाव चौकात अनधिकृत स्टॉलधारकांची संख्या अधिक आहे. यामधील काही स्टॉलवर कारवाई करण्यात आली आहे. उर्वरित स्टॉलचा विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यांनी जर स्वतःहून अतिक्रमणे काढून घेतले नाहीत, तर त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येणार आहे.

 

Back to top button