पुणे : डांबरीकरण, पदपथ दुरुस्तीची कामे 25 डिसेंबरपर्यंत करा | पुढारी

पुणे : डांबरीकरण, पदपथ दुरुस्तीची कामे 25 डिसेंबरपर्यंत करा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिका प्रशासनाकडून जी-20 देशांच्या बैठकीच्या तयारीला वेग आला असून, महापालिका आयुक्तांनी गुरुवारी काही विभागप्रमुखांसह विमानतळ ते सेनापती बापट रस्त्याची पाहणी केली. त्यात या रस्त्यावर अनेक ठिकणी डांबरीकरण, पदपथांची दुरुस्ती, दुभाजकांची रंगरंगोटीची कामे येत्या 25 डिसेंबरपर्यत पूर्ण करण्याच्या सूचना केल्या आहेत.

जगातील 20 प्रमुख अर्थव्यवस्थांचा गट असलेल्या जी-20 गटाची परिषद पुढील वर्षी देशात होणार आहे. या परिषदेतील काही बैठका पुणे, मुंबई आणि औरंगाबाद या तीन शहरांत होतील. यापैकी 13 ते 15 जानेवारी, 16 ते 18 जून व 28 व 29 जून रोजीच्या बैठका पुण्यात होणार आहेत. त्यानिमित्त पुण्यात येणार्‍या विविध देशांच्या प्रतिनिधींना शहराचे विद्रूप, अस्वच्छ चित्र दिसू नये, यासाठी केंद्र व राज्य स्तरावर सूचना दिल्या आहेत.

त्यानुसार विमानतळ ते सेनापती बापट रस्त्याची पाहणी करण्यात आली. यावेळी आयुक्त विक्रम कुमार, नगर अभियंता प्रशांत वाघमारे, पथ विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी, विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदुल, प्रकल्प अभियंता श्रीनिवास बोनाला, मेट्रो, पीएमआरडीचे अधिकारी उपस्थित होते. पाहणी करताना हा रस्ता अनेक ठिकणी खराब आहे. त्यामुळे तेथे डांबरीकरण केले जाणार आहे. या रस्त्यावरील पदपथांची दुरुस्ती, दुभाजकांची रंगरंगोटीची कामे केली जाणार आहेत. येत्या 25 डिसेंबरपर्यंत ही सर्व कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.

Back to top button