पुणे : ऑनलाइन प्रणालीद्वारे होणार कागदपत्रांची छाननी | पुढारी

पुणे : ऑनलाइन प्रणालीद्वारे होणार कागदपत्रांची छाननी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शिक्षक भरतीला मान्यता नसतानाही बनावट कागदपत्रांच्या आधारे माध्यमिक शिक्षकांची भरती झाल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. त्यानंतर पुणे जिल्हा परिषदेने माध्यमिक शिक्षकांच्या कागदपत्रांची छाननी करण्याचे ठरवले होते. परंतु, यासाठी मोठा अवधी लागू शकतो म्हणून जिल्हा परिषदेकडून ऑनलाइन प्रणाली विकसीत करण्याचे काम सुरू आहे.

पुणे जिल्हा परिषदेने काही तपासणी किंवा इतर काही मोहिमांसाठी यापूर्वी मोठ्या प्रमाणात अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्ती करून एकाच दिवसात कामे पूर्ण केली आहेत. त्याच धर्तीवर मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी मनुष्यबळ कमी पडणार नसल्याचे देखील सांगितले होते. परंतु, कागदपत्रे जास्त असल्याने जिल्हा परिषदेच्या मनुष्यबळाकडून हे काम केल्यास जास्त दिवस जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली.

शिवाय या कामात पारदर्शकता राहण्यासाठी ऑनलाइन संगणकीय प्रणालीचा वापर केला जाणार असून पुढील दहा दिवसांमध्ये कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश माध्यमिक शिक्षण विभागाला मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी दिले आहेत. अनुदानित, विनाअनुदानित, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांच्या आस्थापनाविषयक बाबींची तपासणी करण्यात येणार आहे.

हे काम तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी शिक्षण विभागाला यापूर्वीच दिले आहेत. त्याचबरोबर ही तपासणी जलद गतीने करण्यास सांगून वेळ मर्यादा निश्चित केली आहे. दरम्यान, याबाबत कर्मचारी उपलब्धतेबाबत सामान्य प्रशासन विभागाला देखील नियोजन करण्यास सांगितले आहे. तर उच्च माध्यमिक शिक्षकांचे कागदपत्र तपासणीबाबत उपसंचालक (शिक्षण) यांच्याशी समन्वय साधण्यात येणार आहे.

या कागदपत्रांची होणार तपासणी
जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांच्या कागदपत्रांची कसून तपासणी होणार आहे. या तपासणीमध्ये प्रमुख्याने नियुक्ती, पद मान्यता, वेतन पडताळणी आदीं गोष्टींची तपासणी केली जाणार आहे.

एक वर्षापासून तपासणी अपूर्ण
जिल्हा परिषदेकडून साधारण एक ते दीड वर्षापासून शिक्षकांची कागदपत्र पडताळणी प्रलंबित आहे. याला काहींकडून विरोधही झाला होता. या विरोधामुळे विलंब होत असल्याचे प्रशासनाकडून नाकारण्यात आले. मात्र, मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या आदेशानंतरही कागदपत्र पडताळणी प्रलंबित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिक्षकांची कागदपत्र तपासणी ऑनलाइन प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. त्यासाठी ही प्रणाली विकसीत करण्याचे काम सध्या सुरू आहे. मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या सूचनेप्रमाणे तपासणी केली जाणार आहे.
                                                                 – सुनंदा वाखारे,
                                                माध्यमिक शिक्षणाधिकारी, जि. प. पुणे.

Back to top button