पुणे : विद्यापीठ उड्डाणपुलापुढे स्पीडब्रेकरच स्पीडब्रेकर! | पुढारी

पुणे : विद्यापीठ उड्डाणपुलापुढे स्पीडब्रेकरच स्पीडब्रेकर!

ज्ञानेश्वर बिजले

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील जुना उड्डाणपूल अडीच वर्षांपूर्वी पाडल्यानंतर तेथे मेट्रोसह नवीन दुमजली उड्डाणपूल बांधण्याच्या कामातील अडथळे संपतच नाहीत. सप्टेंबरमध्ये काम सुरू करण्याचे ठरले असताना अद्यापही कामाला प्रारंभ झालेला नाही. नवीन पुलाचे काम वर्षभरात पूर्ण करण्यासंदर्भात विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी गुरुवारी (दि.1) अधिकार्‍यांना फैलावर घेतले. राव यांच्या अध्यक्षतेखाली पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाची (पुम्टा) बैठक झाली.

आमदार सिद्धार्थ शिरोळे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलिस उपायुक्त (वाहतूक) विजय मगर, पीएमआरडीए, स्मार्ट सिटी, टाटा कंपनी, पुणे व पिंपरी – चिंचवड महापालिकेचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते. विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाच्या कामाचा यावेळी आढावा घेण्यात आला. हिंजवडी ते शिवाजीनगर या 23 किलोमीटर उन्नत मार्गावर मेट्रो उभारण्यात येत आहे. बाणेर रस्त्याने विद्यापीठ चौकात येणार्‍या मेट्रो पुलासोबत अन्य वाहनांसाठी दुहेरी उड्डाणपूल बांधण्याचे ठरले.

तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानंतर, कोरोना साथीच्या लॉकडाऊनच्या काळात जुलै 2020 मध्ये महापालिकेने बांधलेला उड्डाणपूल पाडण्यात आला. तेव्हापासून तेथे रोज सकाळ-संध्याकाळ वाहतूक कोंडी होत आहे. वाहनचालकांच्या या समस्येला स्थानिक आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत पावसाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधी सूचनेद्वारे वाचा फोडली. याबाबत ’पुम्टा’ची बैठक घेऊन मार्ग काढण्याचे आश्वासन मंत्री दीपक केसरकर यांनी दिले. त्यानुसार 22 सप्टेंबर रोजी ’पुम्टा’ची बैठक झाली.

काय आहेत अडचणी?
पहिल्यांदा चांदणी चौकातील उड्डाणपूल पाडण्यापूर्वी येथील काम सुरू करू नये, असे ठरले. त्यामुळे काम सुरू करण्याचा मुहूर्त सप्टेंबरऐवजी ऑक्टोबर ठरला. पुण्याकडून पिंपरी चिंचवड महापालिका, द्रुतगती मार्ग आणि हिंजवडी आयटी पार्ककडे जाण्यासाठी विद्यापीठ चौक महत्त्वाचा असल्याने तेथे सकाळी व सायंकाळी वाहतुकीची कोंडी होते. पर्यायी रस्ते झाल्याशिवाय मेट्रोचे काम सुरू करण्यास वाहतूक पोलिसांनी विरोध केला. सेनापती बापट रस्त्याने चतु:शृंगी मंदिरापासून दुचाकी वाहनांना जाण्यासाठी मॉडर्न कॉलेजमधून रस्ता बांधण्यात येणार आहे. ते काम अद्यापही सुरू झालेले नाही.

विद्यापीठातून वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेच्या आवारातून भोसलेनगरमध्ये जाण्यासाठी पर्यायी रस्ता बांधण्यात येणार आहे. त्याचे कामही सुरू झालेले नाही. पर्यायी रस्ते बांधले नसल्याने वाहतूक वळविता येणार नाही. चौकातील रस्ता रुंदीकरण झाले. जलवाहिनीचे स्थलांतर पूर्ण होत आले आहे. मेट्रोच्या खांबांसाठी पाया खोदण्यास प्रारंभ झालेला नाही. खांब मोठे व उंच असल्याने खोदकामासाठी रस्त्याची 11 मीटर जागा लागणार आहे. तेवढी जागा अडविल्यास उर्वरित जागेतून वाहने जाताना कोंडी वाढणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

पर्यायी रस्ते बांधण्यासाठी परवानगी मिळाली नसल्याचे महापालिका अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. पीएमआरडीएने परवानगी मिळवून दिल्यास आठवड्यात रस्ते बांधण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मेट्रो उभारणार्‍या टाटा कंपनीच्या अधिकार्‍यांनी कामाच्या वेळा वाढवून देण्याची मागणी केली. ती राव यांनी मान्य केली. तशा सूचना महापालिका आणि पोलिस अधिकार्‍यांना दिल्या. रस्ते बांधण्याचे काम तातडीने करण्यासाठी महापालिका, पीएमआरडीए आणि वाहतूक पोलिस अधिकारी यांची बैठक तातडीने घेण्याची सूचना त्यांनी केली. सातत्याने समन्वय ठेवून समस्या सोडवित काम मार्गी लावण्यास त्यांनी सांगितले.

पीएमआरडीए आणि टाटा कंपनीचे अधिकारी वर्षभरात काम करण्यास तयार आहेत. मात्र, प्रकल्प सल्लागार त्याला फारसे तयार नसल्याचे बैठकीत दिसून आले. त्यामुळे त्यांची एकत्रित बैठक घेऊन नियोजन करावे. त्याचा आराखडा आठवडाभरात देण्याचा आदेश राव यांनी दिला. तंत्रज्ञान कोणते वापरायचे ते तुम्ही ठरवा. मेट्रो प्रकल्पात हा उड्डाणपूल प्राधान्याने बांधण्याचे ठरवावे, असे
त्यांनी सांगितले.

उड्डाणपूल एका वर्षात बांधणार
पीएमआरडीए आणि टाटा कंपनीच्या अधिकार्‍यांनी त्यावेळी नोव्हेंबर 2024 पर्यंत उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन सादर केले. मात्र, वाहनचालकांच्या त्रासाकडे लक्ष वेधत नवीन दुमजली उड्डाणपुलाचे बांधकाम एका वर्षात पूर्ण करण्याची आमदार शिरोळे यांची आग्रही मागणी ’पुम्टा’च्या बैठकीत सौरभ राव आणि महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी मान्य केली. त्यानुसार संबंधित विभागांनी कोणती कामे किती दिवसांत पूर्ण करावयाची, याचे नियोजन करण्यात आले.

त्याचा आढावा घेण्यासाठी ’पुम्टा’ची गुरुवारी (दि.1) बैठक झाली. त्यावेळी अनेक कामे अद्याप सुरूच झाली नसल्याचे दिसून आले. त्यामुळे राव यांनी अधिकार्‍यांना जाब विचारला. नवीन उड्डाणपुलाचे उद्घाटन जानेवारी 2024 मध्ये करावयाचे असून, त्यासाठी त्या कामातील सर्व अडथळे तातडीने दूर करण्याचा आदेश त्यांनी दिला. संबंधित अधिकार्‍यांनी समन्वय ठेवून कामाला गती द्यावी, अशी सूचना त्यांनी केली.

वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा खूप त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे मेट्रोचे काम करताना विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाला प्राधान्य दिले पाहिजे. दुमजली पूल वर्षभरात उभारून तो वापरात आल्यास कोंडीची समस्या सुटेल. आवश्यकता भासल्यास विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न मी पुन्हा मांडीन.

                                                                             सिद्धार्थ शिरोळे,
                                                                                   आमदार

 

 

Back to top button