पुणे : शाळांसाठी केंद्रप्रमुखांच्या भरतीचा मार्ग मोकळा | पुढारी

पुणे : शाळांसाठी केंद्रप्रमुखांच्या भरतीचा मार्ग मोकळा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील जिल्हा परिषद शाळांसाठीच्या केंद्रप्रमुखांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रप्रमुखांच्या रिक्त पदांपैकी 50 टक्के पदे पदोन्नतीने, तर 50 टक्के पदे विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्याचा निर्णय घेण्यात आला असून, राज्य परीक्षा परिषदेमार्फत विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. राज्यातील जिल्हा परिषद शाळांतील शिक्षणाचे नियोजन, विद्यार्थ्यांची उपस्थिती टिकवणे, शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी 4 हजार 860 केंद्रीय प्राथमिक शाळा स्थापन करून दहा शाळांसाठी एक केंद्र या प्रमाणे 4 हजार 860 केंद्र प्रमुखांची पदे निर्माण करण्यात आली.

2010 मध्ये केंद्र प्रमुख भरतीसाठी सरळसेवा, पदोन्नती आणि मर्यादित भरती परीक्षेसाठी 40:30:30 असे प्रमाण निश्चित करण्यात आले. त्यानुसार 2014 मध्ये ग्रामविकास विभागाने केंद्र प्रमुखाचे सेवा प्रवेश नियम, 2017 मध्ये कार्यपद्धती निश्चित केली. मात्र या कार्यपद्धतीनुसार पदभरती होत नसल्याचे निदर्शनास आल्याने भरतीचे प्रमाण बदलून आता 50 टक्के पदे पदोन्नतीने, तर 50 टक्के पदे विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले.

स्पर्धा परीक्षेद्वारे भरतीसाठी अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी जाईल. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची ही परीक्षा ऑनलाइन किंवा ऑफलाइन घेतली जाईल. या परीक्षेसाठी कमाल वयोमर्यादा पन्नास वर्षे असेल. तर किमान पन्नास टक्के गुणांसह पदवी आणि शिक्षण सेवक कालावधी वगळून अखंड नियमित तीन वर्षे सेवा पूर्ण केलेले शिक्षक परीक्षेसाठी पात्र असतील.

ज्या जिल्हा परिषदेत शिक्षक कार्यरत असतील त्याच जिल्ह्यासाठी पात्र असतील, असे नमूद करण्यात आले आहे. पदोन्नतीने नियुक्तीसाठी शिक्षण सेवक कालावधी वगळून अखंड नियमित तीन वर्षे सेवा पूर्ण केलेल्या उमेदवारांतून सेवाज्येष्ठता आणि गुणवत्ता या आधारे निवड करण्यात येईल. कागदपत्र पडताळणीसाठी जिल्हा स्तरावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली समिती असेल.

 

 

 

Back to top button