पुणे : तंत्रशिक्षण प्रवेशापासून विद्यार्थी वंचित | पुढारी

पुणे : तंत्रशिक्षण प्रवेशापासून विद्यार्थी वंचित

गणेश खळदकर

पुणे : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रवेशप्रक्रियेत कागदपत्रे नसल्याने विद्यार्थ्यांना अडचणी येत असून, त्यांचे प्रवेश रद्द होत आहेत. त्याचबरोबर यंदा जागांपेक्षा जास्त अर्ज आल्यामुळे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे प्रवेशप्रक्रियेत समुपदेशक फेरी राबविण्याची गरज असल्याचे मत संस्थाचालकांनी व्यक्त केले आहे.

उच्च व तंत्रशिक्षणाच्या विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्यातील विद्यार्थ्यांकडे प्रवेशाच्या अंतिम मुदतपर्यंत वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र आदी कागदपत्रे उपलब्ध होत नसल्याचे सध्या चित्र आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे राखीव प्रवर्गातील प्रवेश रद्द होत आहेत. ही प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांना अपलोड करण्यासाठी कालावधी देण्याची आवश्यकता आहे.

डिप्लोमा इंजिनीअरिंगचे उत्तीर्ण विद्यार्र्थी हे प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी पात्र असतात, मात्र प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठीची अंतिम मुदत संपली आहे, तर थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरिंग पदवी अभ्यासक्रमाची अंतिम तारीख 24 डिसेंबर असून, येथे प्रवेशासाठी जागा कमी असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांला द्वितीय वर्षात प्रवेश मिळला नाही, तर त्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे प्रथम वर्ष इंजिनिअरिंग पदवी अभ्यासक्रमासाठीची प्रवेशाची अंतिम तारीख वाढविण्याची मागणी संस्थाचालक तसेच प्राचार्यांनी केली आहे.

संस्था स्तरावर प्रवेशाला परवानगी द्यावी
शैक्षणिक वर्ष 2015-16 पूर्वी व्यावसायिक अभ्यासक्रमांना त्या विभागाच्या कार्यालयामार्फत समुपदेशक फेरी घेतली जात होती. मात्र, सद्य:परिस्थितीत समुपदेशक फेरी घेतली जात नसल्याने, कमी गुण असलेल्या विद्यार्थ्याला अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळत नाही. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षापासून समुपदेशक फेरी ही त्या विभागाच्या कार्यालयामार्फत राबविण्यात यावी. सर्व केंद्रीयभूत प्रवेशाच्या फेर्‍या संपल्यावर ईडब्ल्यूएस प्रवर्गाच्या रिक्त जागी, त्याच प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना संस्थास्तरावर प्रवेशाला परवानगी द्यावी, अशी मागणी संस्थाचालक करीत आहेत.

जात वैधता, नॉन क्रिमीलेअर, ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र अपलोड करण्यासाठी मुदवाढ द्यावी, समुपदेशक फेरी राबविण्यात यावी; तसेच प्रथम वर्ष इंजिनिअरिंगच्या पदवी अभ्यासक्रमाला मुदतवाढ द्यावी, अशा मागण्या असोसिएशन ऑफ द मॅनेजमेंट ऑफ अनऐडेड इन्स्टिट्यूट्स इन रुरल इंडियाने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केल्या आहेत.
                                          प्रा. रामदास झोळ, अध्यक्ष, असोसिएशन
                          ऑफ द मॅनेजमेंट ऑफ अनऐडेड इन्स्टिट्यूट्स इन रूरल इंडिया

Back to top button