नायगाव : बीडीओंचे ग्रामसेवकांना पुन्हा फर्मान | पुढारी

नायगाव : बीडीओंचे ग्रामसेवकांना पुन्हा फर्मान

नायगाव; पुढारी वृत्तसेवा : पुरंदर तालुक्यातील अनेक ग्रामसेवक कामकाजाच्या वेळी सजेच्या ठिकाणी उपस्थित राहत नसल्याने गटविकास अधिकार्‍यांनी अशा बेशिस्त ग्रामसेवकांना बुधवारी (दि.30) दुसर्‍यांदा फर्मान काढले. दुसर्‍यांदा नोटीस बजवावी लागल्याने बीडीओंच्या आदेशाला ग्रामसेवक जुमानत नसल्याची चर्चा होत आहे. बेशिस्त ग्रामसेवकांना वरदहस्त कोणाचा? या मथळ्याखाली दैनिक मपुढारीफने 23 नोव्हेंबर रोजी बातमी प्रसिद्ध केली होती.

याची दखल घेत सोमवारी (दि.28) गटविकास अधिकारी अमर माने यांनी ग्रामसेवकांना कामकाजाच्या वेळेत सजेच्या ठिकाणी उपस्थित राहण्याच्या नोटिसा बजावल्या. कामकाजाच्या वेळी कार्यालयात अनुपस्थिती,उशिरा येणे व वेळेपूर्वीच कार्यालयातून पलायन, अनेक दिवस विनापरवानगी दांडी, असे नियमबाह्य वर्तन करणार्‍या ग्रामसेवकांना गटविकास अधिकार्‍यांनी यापूर्वीही नोटिसा बजावल्या होत्या.

यामुळे अनेक ग्रामसेवकांनी नियमाचे पालन करण्यास सुरुवात केली. काही महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतर गटविकास अधिकारी अमर माने यांना पुन्हा त्याच विषयाच्या अनुषंगाने ग्रामसेवकांना नोटिसा बजवाव्या लागल्या आहेत. यामुळे गटविकास अधिकार्‍यांच्या आदेशाला ग्रामसेवक जुमानत नाहीत का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

पाच महिन्यांनंतरही कार्यवाही नाही
अनेक वेळा अनुपस्थिती व कार्यालयात उशिरा उपस्थिती, महापुरुषांच्या जयंतीला दांडी आदी कारणास्तव पूर्व पुरंदरमधील एका ग्रामसेवकाविरोधात स्थानिक ग्रामस्थांनी गटविकास अधिकार्‍यांकडे तक्रार केली होती. दरम्यान, झालेल्या सुनावणीत तक्रारदारांनी सर्व पुरावेही सादर केले होते. मात्र, सुनावणीला पाच महिने होऊनही अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

Back to top button