पुणे : दहा टक्के व्याजाने पैसे उकळणारा सावकार जेरबंद | पुढारी

पुणे : दहा टक्के व्याजाने पैसे उकळणारा सावकार जेरबंद

पुणे; पुढारी वृत्तसेवा : दहा टक्के व्याजाने पैसे उकळणार्‍या सावकाराला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. योगेश पंडित भालेराव (वय 27, रा. गोकुळनगर, बाजारपेठ, लोहगाव रोड, धानोरी) असे त्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादींचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांनी टेम्पो घेतला होता. फायनान्सचे हप्ते फेडण्यासाठी त्यांनी भालेरावकडून एप्रिल 2021 मध्ये दोन व फेब्रवारीत दोन असे चार लाख रुपये प्रतिमहा दहा टक्के व्याजाने घेतले होते. ऑगस्ट 2022 मध्ये फिर्यादींनी व्याज आणि मुद्दल मिळून भालेराव याला 4 लाख 80 हजार रुपये परत केले. तरीदेखील त्याने फिर्यादींना शिवीगाळ करून टेम्पो ताब्यात घेण्याची धमकी देऊन दंड म्हणून आणखी 4 लाख 80 हजार रुपयांची मागणी केली.

फिर्यादीने गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दिली होती. दाखल तक्रारीची चौकशी करून पोलिसांनी गुन्हा दाखल करून सावकार योगेश भालेराव याला अटक केली आहे. ही कारवाई अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे, सहायक निरीक्षक चांगदेव सजगणे, उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, मोहन जाधव, कर्मचारी विजय गुरव, प्रदीप शितोळे, शैलेश सुर्वे, विनोद साळुंके यांच्या पथकाने केली.

Back to top button