पुणे : कुपोषित मुक्तीचे उपाय ठरताहेत तोकडे | पुढारी

पुणे : कुपोषित मुक्तीचे उपाय ठरताहेत तोकडे

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने ग्रामविकास बाल केंद्र सुरू केले. जिल्ह्यात 50 दिवस या केंद्रात 846 कुपोषित बालकांसाठी विशेष नियोजन केले होते. मात्र, तरी देखील वीस टक्के बालकांमध्ये सुधारणा होऊ शकलेली नाही. 677 बालकांमध्ये सुधारणा झाली असून, ती कुपोषणमुक्त झाली आहेत.

कुपोषित बालकांना दैनंदिन आहार, औषधे आणि त्यांचे दररोज मॉनिटरिंग केले जात आहे. या मुलांच्या पोषणासाठी अंगणवाडी सेविकांना जिल्हा परिषदेने निधी दिला आहे. शनिवारी व रविवारी या सुटीच्या दिवशी तालुक्यातील अधिकार्‍यांना दुसर्‍या तालुक्यात जाऊन प्रत्यक्षात पाहणीची जबाबदारी दिली होती. या केंद्रामध्ये बालकांना 8 वेळा पौष्टिक आहार व आवश्यक औषधे देण्यात आली आहेत.

ग्राम बालविकास केंद्रामध्ये देण्यात येणार्‍या आहारामध्ये नाचणीची खीर, गहूसत्त्व खीर, कोथिंबीर मुठिया, मेथी मुठिया, मसाला इडली, थालीपीठ, केळी, मुरमुरा लाडू, अशा पदार्थांचा समावेश होता. आहारासाठी प्रतिबालक 2 हजार 250 रुपयांप्रमाणे अंगणवाडीसेविका यांच्या खात्यावर देण्यात आले होते.

ग्राम बालविकास केंद्रामध्ये दाखल केलेल्या 131 तीव्र कुपोषित (सॅम) बालकांपैकी 107 बालकांमध्ये सुधारणा झाली आहे. 715 मध्यम कुपोषित (मॅम) बालकांमधून 570 बालके साधारण झाली आहेत. बालविकास केंद्रांमध्ये बालकांना सात प्रकारची औषधे देण्यात आली. जिल्ह्यातील 538 अंगणवाडीत या बालकांवर उपचार करून आणि त्यांना आहार दिला गेला. जिल्हा परिषदेने हा अनोखा उपक्रम आखला; पण तरी देखील संपूर्ण मुले कुपोषण मुक्त होऊ शकलेले नाहीत.

कुपोषित बालकांची सद्य:स्थिती…

प्रकार             पूर्वीची संख्या     सुधारणा    सध्याची संख्या
सॅम बालके           131              107              24
मॅम बालके            715             570            145

जी वीस टक्के बालके पूर्णपणे बरी झालेली नाहीत, त्यांची वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. आत्ताचे कुपोषणाचे प्रमाण पुण्यातील आत्तापर्यंतचे सर्वांत कमी प्रमाण आहे.
                                                                     – आयुष प्रसाद,
                                                        मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प.

Back to top button