पुणे : ‘व्हेल’च्या उलटीची तस्करी; टोळीचा पर्दाफाश | पुढारी

पुणे : ‘व्हेल’च्या उलटीची तस्करी; टोळीचा पर्दाफाश

पुणे; पुढारी वृत्तसेवा : औषधनिर्मिती व उच्च प्रतीच्या निर्यात होणार्‍या सेंटच्या उत्पादनासाठी वापरल्या जाणार्‍या व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीचा पर्दाफाश डेक्कन पोलिसांच्या पथकाने केला. विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या 5 जणांना डेक्कन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास फर्ग्युसन कॉलेज बसस्टॉपच्या पाठीमागील बाजूस हा कारवाई केली आहे.

राजेंद्र राकेश कोरडे (वय 28, रा. अंजर्ले, ता. दापोली), नवाज अब्दुल्ला कुरुपकर (वय 24), अजिम महमूद काजी (वय 50, दोघे रा. अडखळ, अंजर्ले, ता. दापोली), विजय विठ्ठल ठाणगे (वय 56), अक्षय विजय ठणगे (वय 26, दोघे रा. धनकवडी, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आरोपींवर डेक्कन पोलिस ठाण्यात वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपास पथकाच्या सहायक पोलिस निरीक्षक कल्याणी पाडोळे या हद्दीत गस्त घालत होत्या. यादरम्यान, व्हेल माशाच्या कोट्यवधी रुपयांच्या उलटीची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथक आरोपींचा शोध घेत होते. फर्ग्युसन कॉलेज बसस्टॉपच्या मागील बाजूस 3 जण संशयास्पद उभे असल्याचे दिसले. त्यांना ताब्यात घेऊन बॅगेची तपासणी केली असता, व्हेल माशाच्या उलटीचा तुकडा आढळून आला. त्यांनी व्हेल माशाची उलटी विक्री करण्यासाठी आणल्याचे सांगितले. त्यांना मदत करण्यासाठी दोन जण आल्याचे सांगितले. विजय ठाणगे व अक्षय ठाणगे या दोघांना ताब्यात घेतले.

आरोपी कोरडे याच्या बॅगेमध्ये 2 किलो 994 ग्रॅम वजनाचा व्हेल माशाच्या उलटीचा तुकडा आढळला. त्याची किंमत 2 कोटी 99 लाख 40 हजार रुपये आहे, तर नवाज कुरुपकर याच्या बॅगेतून 2 कोटी 28 लाख 60 हजार रुपये किमतीचा 2 किलो 286 ग्रॅम वजनाचा व्हेल माशाच्या उलटीचा तुकडा जप्त केला. ठणगे याच्या ताब्यातून दुचाकी जप्त केली. ही कारवाई पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुरलीधर करपे, सहायक पोलिस निरीक्षक पाडोळे, दत्ता शिंदे, महेंद्र बोरसे, स्मिता पवार, सचिन गायकवाड, विनय बडगे यांनी ही कारवाई केली.
अत्तरनिर्मितीसाठी उपयुक्त

ब्लू व्हेलला देवमासा म्हणून ओळखले जाते. हा मासा शारीरिक प्रक्रियेतून उलटी करतो. ती उलटी द्रव स्वरूपात असते. मात्र, पाण्यात विरघळणारी नसते. या उलटीला ’अंबर ग्रीस’ असे म्हटले जाते. त्याच्या न विरघळणार्‍या द्रव स्वरूपामुळे या उलटीचा गठ्ठा तयार होतो. तो पाण्यावर तरंगू लागतो. हा गठ्ठा जाळ्यात अडकतो किंवा किनार्‍यापर्यंत तरंगत येतो. अत्तरनिर्मितीत एक खूप महत्त्वाचा घटक म्हणून या उलटीचा वापर केला जातो.

आंतरराष्ट्रीय बाजारात या उलटीची किंमत सव्वापाच कोटी असल्याचे सांगितले जाते. तिचा उपयोग उच्च दर्जाचे परफ्यूम व औषधे बनविण्यासाठी केला जातो. ही उलटी त्यांनी दापोली येथून तस्करी करून आणल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पुण्यात ही टोळी कोणाला उलटी विकणार होती, त्याचा तपास केला जात आहे. त्याच्या तपासात महत्त्वपूर्ण माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
                                                     – मुरलीधर करपे, वरिष्ठ निरीक्षक,
                                                            डेक्कन पोलिस ठाणे

Back to top button