पुणे : पालिकेला वर्षाला 23 टीएमसी पाणी | पुढारी

पुणे : पालिकेला वर्षाला 23 टीएमसी पाणी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेकडून दरवर्षी सुमारे 23 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीवापर होत असून, महापालिका क्षेत्रातील प्रतिमाणशी पाणीवापर 270 लिटरवर पोहोचला आहे, अशी माहिती कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत जलसंपदा विभागाने केलेल्या सादरीकरणातून समोर आली आहे. पुणे महापालिकेला खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातून 11.60 टीएमसी, पवना प्रकल्पातून 0.34 टीएमसी, तर भामा आसखेड प्रकल्पातून 2.67 टीएमसी असे एकूण 14.61 टीएमसी पाणी सन 2031 साली होणार्‍या संभाव्य 76.16 लाख लोकसंख्येसाठी मंजूर आहे. मात्र, सध्या महापालिका खडकवासला धरणातून 1451 दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी), कालव्यातून 174 एमएलडी असे एकूण 1,625 एमएलडी पाणी उचलते.

याशिवाय पवना (रावेत बंधार्‍यातून) 30 एमएलडी, भामा आसखेड धरणातून 140 एमएलडी असे दररोज एकूण 1,795 एमएलडी पाणी उचलण्यात येते. या सर्वांचा वर्षाचा हिशेब केल्यास प्रतिवर्षी महापालिका 23.13 टीएमसी पाण्याचा वापर करते. महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट असलेल्या केशवनगर, शिवणे, न्यू कोपरे, कोंढवे धावडे, फुरसुंगी उरुळी देवाची, ग्रुप ग्रामपंचायत फुरसुंगी, वारजे, वाघोली, मांजरी आणि औताडे हांडेवाडी अशा दहा ग्रामपंचायतींसाठी 1.76 टीएमसी आणि 18 खासगी संस्थांसाठी 0.48 टीएमसी असे एकूण 2.24 टीएमसी पाणी जलसंपदा विभागाकडून कालव्याद्वारे पुरवठा करण्यात येते.

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या 22 सप्टेंबर 2017 च्या निकषानुसार महापालिकेने दररोज 150 लिटर प्रतिमाणशी या मापदंडाप्रमाणे पाणी वापरण्याचे आदेश आहेत. मात्र, महापालिकेचा दररोजचा पाणीवापर प्रतिमाणशी तब्बल 270 लिटर एवढा आहे. याशिवाय महापालिकेच्या पाणी वितरणात तब्बल आठ टीएमसी पाण्याची गळती होत असल्याची कबुली खुद्द पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

 

Back to top button