मोठी बातमी: बैलगाडा शर्यतींना मिळणार परवानगी  | पुढारी

मोठी बातमी: बैलगाडा शर्यतींना मिळणार परवानगी 

पुणे, पुढारी वृत्तसेवा: प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक लंम्पी रोगामुळे बैलगाडा शर्यतींना बंदी घालण्यात आली होती. परंतु, आता रोगाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने संबंधित तालुक्यातील पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांच्याकडील अभिप्राय प्राप्त झाल्यानंतरच बैलगाड्यांच्या शर्यत आणि बाजाराला परवानगी दिली जाणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आदेश जारी केले आहेत.

प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 मध्ये सुधारणेची अधिसूचना राज्य शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्सयव्यवसाय विभागाने काल जारी केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी हे जिल्ह्यातील लंम्पी चर्म रोगाचा आढावा घेतल्यानंतर नियंत्रित क्षेत्रात जनावरांचा बाजार आणि शर्यती लावण्यास परवानगी देऊ शकतात, असे आदेशात नमूद केले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकार्‍यांना त्यांच्या उपविभागाच्या कार्यक्षेत्रामध्ये बैलगाड्यांचे शर्यतीस परवानगी देण्याबाबत अधिकार यापूर्वीच प्रदान केलेले आहेत. जिल्ह्यातील सर्व संबंधित उपविभागीय अधिकारी यांनी कोणताही प्राणी बाजार भरवणे तसेच प्राण्यांच्या शर्यतीस परवानगी देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने 16 डिसेंबर 2021 रोजी दिलेल्या घटनापीठाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून परवानगी द्यावी. तसेच 10 डिसेंबर 2017 च्या अधिसूचने अन्वये प्रसिद्ध केलेल्या महाराष्ट्र क्रुरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत (बैलगाडी शर्यतीचे आयोजन) नियम 2017 मध्ये विहित करण्यात आलेल्या नियम व अटी / शर्तीचे पालन करुन, बैलगाडी शर्यतीस परवानगी द्यावी, असे डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

Back to top button