वाल्हे केंद्राची रुग्णवाहिका नादुरुस्त, 16 महिन्यांपासून रुग्णांचे हाल; अधिकारी देईनात लक्ष | पुढारी

वाल्हे केंद्राची रुग्णवाहिका नादुरुस्त, 16 महिन्यांपासून रुग्णांचे हाल; अधिकारी देईनात लक्ष

वाल्हे, पुढारी वृत्तसेवा: पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामपंचायतींच्या 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून ऑक्टोबर 2020 मध्ये वाल्हे (ता. पुरंदर) प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळालेली रुग्णवाहिका गेल्या 16 महिन्यांपासून नादुरुस्त आहे. ही रुग्णवाहिका खरेदीसाठी वाल्हे ग्रामपंचायतीसह दौंडज, हरणी, पिंगोरी, जेऊर, पिसुर्टी, राख, नावळी, वागदरवाडी, सुकलवाडी आदी ग्रामपंचायतींनी 14 व्या वित्त आयोगातून निधी उपलब्ध करून दिला होता. मात्र, मागील वर्षी जुलै 2021 मध्ये वाल्हे आरोग्य केंद्रास मिळालेल्या रुग्णवाहिकेचा अपघात झाल्याने रुग्णवाहिका दुरुस्तीसाठी मागील 16 महिन्यांपासून गॅरेजमध्ये दिली आहे.

रुग्णवाहिका दुरुस्त झाली असून, या दुरुस्तीच्या कामाचे बिल अदा न केल्याने अद्याप वाल्हे आरोग्य केंद्रास ही रुग्णवाहिका मिळालेली नाही. वाल्हे प्राथमिक आरोग्य केंद्र पुणे-पंढरपूर पालखी महामार्ग लगत असून, दौंडज खिंड ते निरा या अरुंद असलेल्या पालखी महामार्गावर वारंवार लहान-मोठे अपघात घडत असतात. या वेळी तत्काळ रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यास अनेकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.

वाल्हे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 11 गावांचा समावेश असून, त्यामध्ये 4 उपकेंद्रे कार्यान्वित आहेत. येथे उपचारांसाठी नेहमीच रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. सध्या 2005 मॉडेलची सुमो गाडी रुग्णवाहिका म्हणून सेवेत आहे. ती वारंवार अनेकदा नादुरुस्त असते. अशा वेळी येथील वैद्यकीय अधिकार्‍यांना गंभीर रुग्णांना पुढील उपचारांसाठी पुढे पाठविण्यासाठी बर्‍याचदा बाहेरून गाडी मागवावी लागते. सद्यःस्थितीत जुनाट रुग्णवाहिकेतून रुग्णांना जीव धोक्यात घालून, नाइलाजास्तव प्रवास करावा लागत असून, रुग्णांना वेळप्रसंगी पदरमोड करून खासगी रुग्णवाहिकांचा आधार घ्यावा लागत आहे.

Back to top button