हुबळी एक्सप्रेसमध्ये तोतया तिकीट निरीक्षक सापडला, पुणे-कराड दरम्यान झाली कारवाई | पुढारी

हुबळी एक्सप्रेसमध्ये तोतया तिकीट निरीक्षक सापडला, पुणे-कराड दरम्यान झाली कारवाई

पुणे, पुढारी वृत्तसेवा: लोकमान्य टिळक टर्मिनस ते हुबळी (क्रमांक १७३१८) या रेल्वे गाडीमध्ये प्रवाशांकडून पैसे वसूल करताना एक तोतया तिकीट निरीक्षक पकडला गेला. पुणे ते कराड दरम्यान सोमवारी रात्री मिरजेचे तिकीट निरीक्षक वाय. वैष्णव, बी. एम. शेख आणि पी.एस. घाडगे यांच्या सतर्कतेमुळे हा तोतया तिकीट तपासणीस पकडला गेला. पुणे रेल्वे स्थानकावरून गाडी सुटल्यावर रेल्वेत ड्युटीवर असलेले तिकीट तपासनीस वाय. वैष्णव यांना काही प्रवाशांनी सांगितले की, डब्यातील एक संशयित व्यक्ती त्यांची तिकिटे तपासत आहे आणि पैसे उकळण्यासाठी दबाव आणत आहे.

ही माहिती मिळताच वैष्णव यांनी त्यांचे सहकारी साथीदार शेख आणि घाडगे यांच्या मदतीने तत्काळ संशयिताला पकडले आणि नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. तोतया तिकीट निरीक्षकाला कराड स्थानकावर लोहमार्ग पोलिसांच्या (जीआरपी) ताब्यात देण्यात आले असून, त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 प्रवाशांनी प्रवासादरम्यान कोणत्याही संशयास्पद व्यक्तीकडून तिकीट तपासणी आणि आर्थिक वसुली होत असल्यास त्याची माहिती त्वरित उपलब्ध रेल्वे कर्मचाऱ्यांना देऊन बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या कारवाया रोखण्यासाठी रेल्वेला मदत करावी.
– मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, रेल्वे, पुणे विभाग

Back to top button