पुणे : चार लाख महिलांना उच्च रक्तदाब | पुढारी

पुणे : चार लाख महिलांना उच्च रक्तदाब

पुणे, पुढारी वृत्तसेवा : ‘राज्यात माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ या अभियानांतर्गत आतापर्यंत 1 कोटी 56 लाख 49 हजार 320 महिलांची तपासणी करण्यात आली. सुमारे अडीच लाख महिलांमध्ये मधुमेह; तर चार लाख महिलांमध्ये उच्च रक्तदाब आढळून आला. 69 लाख 40 हजार 299 महिलांमध्ये मानसिक तणाव असल्याचे निदान झाले आहे.

नोकरी करणारी अथवा गृहिणी, बहुसंख्य महिला कुटुंबाची सर्व जबाबदारी सांभाळताना आणि कुटुंबासाठी झिजताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. ग्रामीण, शहरी व झोपडपट्टी भागात राहणार्‍या सर्व महिलांची स्थिती सारखीच असते. मात्र, आरोग्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. शरीर वारंवार आपल्याला सतर्क करीत असते. शरीराच्या ‘अलार्म’कडे कानाडोळा केल्यास मोठ्या व्याधी जडू शकतात, याकडे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. कल्पना पाटील यांनी लक्ष वेधले.

राज्यात 26 सप्टेंबरपासून दोन महिन्यांमध्ये सुमारे 1 कोटी 56 लाख 49 हजार 320 महिलांची तपासणी करण्यात आली. त्यातील 2 लाख 29 हजार 550 महिलांना मधुमेह; तर 3 लाख 80 हजार 114 महिलांमध्ये उच्च रक्तदाब आढळून आला. 18 हजार 100 महिलांमध्ये गर्भाशयाचा कर्करोग आणि 52 हजार 568 महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे आढळून आली आहेत.

नोकरदार, गृहिणी अशा सर्वच महिलांमध्ये मानसिक ताणतणावाचे प्रमाण वाढत आहे. कुटुंबीयांसाठी झटताना, त्यांचे क्षेमकुशल पाहताना आपल्यालाही मानसिक शांततेची गरज असते, हेच त्या विसरतात. त्यातूनच हार्मोन्सच्या असंतुलनामुळे आणखी भर पडते. चिडचिड होणे, रडू येणे, एकटे वाटणे, थकवा येणे, अशी लक्षणे त्यांच्यामध्ये जाणवतात. कुटुंबाची जबाबदारी एकटीच्या खांद्यावर न घेता सर्वच सदस्यांना हातभार लावण्यास प्रवृत्त करायला हवे. कामाच्या धावपळीतूनही स्वत:साठी, स्वत:च्या आवडीच्या गोष्टींसाठी आवर्जून वेळ काढायला हवा.
– किमया कुलकर्णी

Back to top button