पुणे : ‘अथर्वशीर्ष’ अभ्यासक्रमात आणण्याची कृती बेकायदेशीर : प्रा. नरके | पुढारी

पुणे : ‘अथर्वशीर्ष’ अभ्यासक्रमात आणण्याची कृती बेकायदेशीर : प्रा. नरके

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हंगामी कुलगुरूंची अथर्वशीर्ष अभ्यासक्रमात आणण्याची कृती बेकायदेशीर आणि अभ्यास मंडळ व विद्वत परिषद यांची मान्यता न घेता केलेली आहे. विशेष म्हणजे श्रेयांक असलेला अभ्यासक्रम हंगामी कुलगुरूंच्या अधिकारात येतच नाही, असा दावा ज्येष्ठ लेखक प्रा. हरी नरके यांनी केला आहे.

प्रा. नरके म्हणाले, सध्या विद्यापीठाच्या निवडणुका चालू आहेत. विद्यमान अभ्यास मंडळे व विद्वत परिषदेची मुदत संपलेली असल्याने ती अस्तित्वात नाहीत. अशा वेळी लोकशाही व विद्यापीठ संहिता तसेच आजवरची परंपरा मोडीत काढून हंगामी कुलगुरूंनी मागच्या दाराने हा अभ्यासक्रम लागू केलेला आहे. त्याला अभ्यास मंडळ व विद्वत परिषदेची मान्यता घेतलेली नाही. ही संशयास्पद घाई का केली जात आहे, हंगामी कुलगुरूंनी अभ्यासक्रम ठरवायचा नसतो, असे संकेत असताना विद्यापीठाने लागू केलेला गणेश अथर्वशीर्ष प्रमाणपत्र अभ्यासक्रम बेकायदेशीर व विद्यापीठाच्या अधिकार मंडळाच्या अधिकारावर केलेले अतिक्रमण आहे. हा अभ्यास पूर्ण केल्यास विद्यार्थ्यांना श्रेयांक मिळणार असल्याने तो सक्तीचा नाही, ही मखलाशी लबाडीची असल्याचे देखील प्रा. नरके यांनी स्पष्ट केले.

Back to top button