पुणे : गुरुत्वीय लहरींचा लवकरच लागेल शोध | पुढारी

पुणे : गुरुत्वीय लहरींचा लवकरच लागेल शोध

पुणे : पुढारी वृत्तसेवा  :  कृष्णविवरांचे युगल गीत ऐकण्यासाठी भारतीय पल्सार टायमिंग अरेचा आंतरतारकीय हवामान वेध घेतला जात आहे. जगभरातील सर्व पल्सार टायमिंग अरेचा डेटा एकत्र करण्याचे काम सध्या सुरू आहे. गुरुत्वीय लहरींचा शोध लवकरच लागेल, अशा विश्वासाने वैज्ञानिक अतिशय उत्साहाने या प्रकल्पात व्यस्त असल्याची माहिती जीएमआरटीने दिली.

भारतीय पल्सार टायमिंग अरेतर्फे त्यांच्या पहिल्या डेटा संग्रहाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. हा संग्रह पब्लिकेशन्स ऑफ द अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ ऑस्ट्रेलिया (पासा) या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. या संशोधनात 40 पेक्षा जास्त भारतीय व जपानी शास्त्रज्ञांचा समावेश आहे. अतिसूक्ष्म तरंग लांबीच्या गुरुत्वीय लहरींचा शोध घेण्यासाठी ते आंतरराष्ट्रीय पल्सार टायमिंग अरे या संघाबरोबर कार्यरत आहेत. पुण्यातील एनसीआरए-टीआयएफआर संचालित जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी)) या महादुबिर्णीतून घेतलेल्या साडेतीन वर्षांच्या निरीक्षणांचा या डेटा संग्रहात समावेश आहे.

जीएमआरटीमधून एकाच वेळेस विविध तरंगलांबीच्या रेडिओ लहरींचा अभ्यास करता येतो. या वैशिष्ट्यांमुळे वैज्ञानिकांना आंतरतारकीय इलेक्ट्रॉन घनतेतील बदलांचा सर्वाधिक अचूक अंदाज बांधता येतो. आयपीटीएमधील इतर संघांना या माहितीचा उपयोग करून त्यांचे अंदाज अधिक अचूक करण्यास मदत होते. गुरुत्वीय लहरींचा वेध घेण्यासाठी मिलिसेकंद पल्सार या अतिशय वृध्द न्यूट्रानकडून येणार्‍या रेडिओ स्पंदनांचा अभ्यास केला जातो. ही रेडिओ स्पंदने पृथ्वीवर येण्याच्या वेळांमध्ये अतिशय सूक्ष्म विलंब होतात. हे विलंब अचूकपणे मोजून गुरुत्वीय लहरींचा वेध घेतला जातो. आंतरतारकीय हवामान हा ती खरखर ऐकू येण्यामागचा स्रोत आहे.

आंतरतारकीय माध्यमात रेडिओ स्पंदने थोड्या प्रमाणात अस्ताव्यस्त होतात. या परिणामाचा परिपूर्ण अंदाज करणे अवघड असते. अचूक पद्धतीने निरीक्षण नोंदविणे हा एकच मार्ग त्यासाठी उपलब्ध आहे. एनपीटीएच्या निरीक्षणांच्या माध्यमातून हेच साध्य केले आहे. गुरुत्वीय लहरींच्या वेधासाठी सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय समुदायाचा भाग असण्याखेरीज या डेटा संग्रहांचा उपयोग करून शास्त्रज्ञ इतरही अनेक प्रयोग करीत आहेत. यातील काही निकर्ष वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध झाले असून, अनेक प्रकल्पांवर सध्या काम सुरू आहे.

पहिले यश 2015 मध्ये

गुरुत्वीय लहरींचा थेट शोध घेण्यास वैज्ञानिकांना सर्वप्रथम 2015 मध्ये यश आले (या शोधास 2017 मध्ये नोबेल पारितोषिक बहाल करण्यात आले होते). या शोधामुळे गुरुत्वीय लहरींच्या नवा अध्याय सुरू झाला. आतापर्यंत निरीक्षणे नोंदविलेल्या गुरुत्वीय लहरी न्यट्रूॉन तारे किंवा सामान्य कृष्णविवरांच्या विलिनीकरणाच्या शेवटच्या टप्प्यातून उत्सर्जित होतात. या लहरींची वारंवारिता सेकंदाला काही शेकड्यापर्यंत असते आणि त्या सेकंदाच्या काही हजाराव्या भागापर्यंतच टिकतात. काही कृष्णविवरे मात्र सूर्याच्या वस्तुमानाच्या काही दशलक्ष किंवा काही अब्ज पटीपर्यंत जड  असू शकतात.

Back to top button