पुणे : सहकार, साखर व पणनच्या रिक्त जागांसाठी फिल्डिंग | पुढारी

पुणे : सहकार, साखर व पणनच्या रिक्त जागांसाठी फिल्डिंग

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  राज्याचे पणन संचालक व राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालकपदी कार्यरत असलेले सहकारचे अपर निबंधक सुनील पवार, सहकार आयुक्तालयातील अपर निबंधक (तपासणी व निवडणूक) आणि पुणे प्रादेशिक साखर सह संचालक या पदांवर सध्या कार्यरत असणारे धनंजय डोईफोडे हे महिनाअखेर सेवानिवृत्त होत आहेत. तसेच मुंबई बाजार समितीमधील अतिरिक्त सचिवपद रिक्त असून या पाचही जागांसाठी इच्छुकांनी मंत्रालय स्तरावर जोरदार फिल्डिंग लावलेली आहे.

सहकार आयुक्तालयातून मंत्रालयात पाठविण्यात आलेल्या पदोन्नतीच्या फायली तशाच पडून आहेत. सहकारचे विभागीय सह निबंधक पदावरून पदोन्नती देऊन अपर निबंधक दर्जाच्या पदावर जाण्याबाबतची 13 अधिकार्‍यांची फाईल मंत्रालयात आहे. तसेच अपर निबंधक पदावरून अपर आयुक्त पदावर बढती देणार्‍या फायलींचाही समावेश आहे. त्याबाबतचा निर्णय येत्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सहकार आयुक्तालयाच्या आस्थापनेवर पणन संचालनालय, कृषी उत्पन्न बाजार समित्या, साखर आयुक्तालय आणि सहकार विभागातील अन्य सहकार व अन्य विभागात असलेल्या जागांवर प्रतिनियुक्तीने अधिकारी, कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या केल्या जातात. मूळ आस्थापना ही सहकार विभागाचीच आहे. पणन संचालक पद हे अपर आयुक्त दर्जाचे आहे. मात्र, बहुतांश वेळा अपर निबंधक पदावरील अधिकार्‍यांची नियुक्ती केली गेलेली आहे. पात्र असूनही पदोन्नत्या न मिळताच अधिकारी सेवानिवृत्त होत आहेत, हीसुध्दा वस्तुस्थिती असल्याचे सांगण्यात आले.

पणन संचालक पदावर सध्याचे अपर निबंधक आणि बहुतांशी मुंबई शहरातच अधिक काळ विविध पदे भूषविलेले सुधीर तुंगार यांच्या नावाची चर्चा अधिक आहे. नागपूर कनेक्शन वापरून काही अधिकार्‍यांनी पणन मंडळातील कार्यकारी संचालक पदासाठीही फिल्डिंग लावली असून, सहकार सचिवही त्या द़ृष्टिने अनुकूल असल्याचे समजते. मुंबई बाजार समितीवर दोन अपर निबंधक कार्यरत असून सचिवांचे एक पद भरले आहे. तर रिक्त अतिरिक्त सचिवपदासाठी पुण्यातील एका अपर निबंधकांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. तसे झाल्यास पुण्यातील अपर निबंधकांचे सध्या ते काम पाहात असलेले पदही रिक्त होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत या वरिष्ठ पदांवरील नियुक्त्यांबाबत मोठ्या हालचाली अपेक्षित असल्याचे सहकारमधील सूत्रांनी सांगितले.

Back to top button