पुणे : सात केेंद्रांवर उद्या मिळेल कोव्हिशिल्ड | पुढारी

पुणे : सात केेंद्रांवर उद्या मिळेल कोव्हिशिल्ड

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  महापालिकेतर्फे 28 नोव्हेंबर रोजी सात लसीकरण केंद्रांवर पहिल्या, दुस-या आणि बुस्टर डोससाठी कोव्हिशिल्ड लस उपलब्ध करून दिली जाणार आहे. महापालिकेला राज्य सरकारकडून कोव्हिशिल्डचे 3000 डोस मिळाले आहेत. त्यामुळे नागरिकांनी पुढील तीन-चार दिवसांत कोव्हिशिल्ड लस हवी असल्यास लसीकरण केंद्रावर येण्याचे आवाहन करण्यात
आले आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनांनुसार, बुस्टर डोससाठी सुरुवातीला कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीचे डोस उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यानंतर शासनाकडून कोव्हिशिल्ड लसींचा पुरवठा थांबवण्यात आला होता. त्यानंतर बुस्टर डोससाठी कॉर्बेव्हॅक्स लसीचे डोस उपलब्ध करून देण्यात आले.

कोव्हिशिल्डची लस मिळत नसल्याने अनेक नागरिकांनी बुस्टर डोसकडे पाठ फिरवली होती. पहिले दोन्ही डोस कोव्हिशिल्डचे घेतलेल्या नागरिकांना तिस-या डोससाठीही तीच लस घेण्याकडे कल होता. तीन महिन्यांनी राज्य सरकारकडून महापालिकेला कोव्हिशिल्ड लसीचे डोस प्राप्त झाले आहेत. सात लसीकरण केंद्रांवर प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

शहरातील 7 लसीकरण केंद्रांवर उपलब्ध लसीच्या साठ्यापैकी 10 टक्के लस 18 वर्षांपुढील नागरिकांना पहिल्या डोससाठी, 40 टक्के लस दुस-या डोससाठी आणि 50 टक्के लस बुस्टर डोससाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लसीसाठी ऑनलाइन बुकिंग करता येईल किंवा थेट लसीकरण केंद्रांवर जाऊन लस घेता येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली.

पुढील लसीकरण केंद्रांवर लस उपलब्ध

1. कै. मुरलीधर लायगुडे दवाखाना, वडगाव खुर्द
2. क-मला नेहरू रुग्णालय, मंगळवार पेठ
3. भारतरत्न स्व. राजीव गांधी रुग्णालय, येरवडा
4. कै. जयाबाई सुतार दवाखाना, कोथरुड
5. कै. अण्णासाहेब मगर रुग्णालय, हडपसर
6. कै. शिवशंकर पोटे दवाखाना, सहकारनगर
7. व्हीआयटी युगपुरुष शिवछत्रपती दवाखाना, बिबवेवाडी
जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत झालेले लसीकरण
पहिला डोस – 38,84,564
दुसरा डोस – 32,65,815
तिसरा डोस – 5,28,771
——–
एकूण लसीकरण – 76,79,150

Back to top button