पिंपरी : भेदभाव नाही, अहवालानंतर कारवाई ; अवैध लॉटरी सेंटरबाबत पोलिस आयुक्तांचा इशारा | पुढारी

पिंपरी : भेदभाव नाही, अहवालानंतर कारवाई ; अवैध लॉटरी सेंटरबाबत पोलिस आयुक्तांचा इशारा

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा  :  अवैध लॉटरी सेंटरवर कारवाई केल्यानंतर निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रंगनाथ उंडे यांना तडकाफडकी नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले. मात्र, वाकड आणि देहूरोडच्या हद्दीत कारवाई होऊनही संबधित वरिष्ठ निरीक्षकांची पाठराखण करून कर्मचार्‍यांचा बळी देण्यात आला, अशी चर्चा पोलिस वर्तुळात सुरू होती. यावर बोलताना पोलीस आयुक्त अंकुश शिंदे म्हणाले की, कारवाईमध्ये कुठलाही भेदभाव नाही, वाकड आणि देहूरोडच्या करवाईचे अहवाल मागवले आहेत. येथील दोषींवर देखील कारवाई होईल.

याबाबतचे वृत्त असे की, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी 15 नोव्हेंबरला अवैध लॉटरी सेंटरवर छापा मारला. त्यानंतर त्यांच्या पथकाने पिंपरी, देहूरोड, वाकड भागातील अवैध धंद्यांवर छापे मारले. दरम्यान, आयुक्तांनी निगडीचे वरिष्ठ निरीक्षक रंगनाथ उंडे यांच्यावर तडकाफडकी कारवाई करून त्यांना नियंत्रण कक्ष येथे संलग्न केले.  तसेच, देहूरोडचे सहायक पोलिस निरीक्षक दिगंबर अतिग्रे, वाकडचे सहायक निरीक्षक संतोष पाटील, संभाजी जाधव यांच्यासह 18 कर्मचार्‍यांना बावधन वाहतूक विभागाला संलग्न केले. 18 नोव्हेंबरला याबाबत आदेश काढण्यात आले. त्यानंतर 23 नोव्हेंबरला रात्री निगडी पोलिस ठाण्यातील तपास पथकातील कर्मचारी सतीश ढोले, विलास केकाण, राहुल मिसाळ, नितीन सपकाळ या चौघांना निलंबित करण्याचे आदेश दिले.

निगडी पोलिस या धक्क्यातून बाहेर पडत असताना शुक्रवारी (दि. 25) निगडी तपास पथकातील पोलीस कर्मचारी दत्तात्रय बबन शिंदे, सुधाकर तुकाराम अवताडे, शंकर भागुजी बांगर, सोमनाथ रामदास दिवटे, विजय विठ्ठलराव बोडके, भूपेंद्र खंडू चौधरी, विनोद तान्हाजी व्होनमाने, तुषार पांडुरंग गेंगजे, राहुल बाबूराव गायकवाड या नऊ कर्मचार्‍यांना हिंजवडी वाहतूक विभाग येथे संलग्न करण्यात आले. सलग झालेल्या या कारवाईमुळे पोलिस आयुक्तांची रेड आणखी किती जणांना भोवणार, हे पाहणे महत्वाचे ठरेल.

Back to top button