पिंपरी : महापालिका रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सुविधांची कमतरता | पुढारी

पिंपरी : महापालिका रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सुविधांची कमतरता

दीपेश सुराणा : 

पिंपरी : खासगी रुग्णालयांतील महागडे उपचार न परवडणार्‍या सर्वसामान्यांचे पाय हमखास महापालिका रुग्णालयांकडे वळतात; मात्र या रुग्णालयांत आल्यानंतर विविध वैद्यकीय चाचण्यांसाठी, औषधांसाठी आणि विशेष उपचारांसाठी पुन्हा बाहेरचा रस्ता धरावा लागत असेल, तर त्यांनी ही व्यथा मांडावी कोठे, अशीच सध्याची परिस्थिती आहे. महापालिकेच्या काही रुग्णालयांमध्ये याबाबत दैनिक ‘पुढारी’च्या प्रतिनिधीने प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली.

नवीन थेरगाव रुग्णालयात विविध चाचण्यांची सुविधा नाही

थेरगाव येथे महापालिकेच्या वतीने नव्याने साकारलेल्या 200 खाटांच्या रुग्णालयात सध्या नवजात बालकांसाठी एनआयसीयू-स्टेप वनचीच सुविधा आहे. त्यासाठी केवळ 4 खाटा उपलब्ध आहेत. त्यामुळे नवजात बालकांना काचेच्या पेटीत ठेवण्याची गरज पडल्यास ती सुविधा उपलब्ध नाही. मेंदूविकार, हृदयरोग, कर्करोग आदींवर सुपरस्पेशालिटी सुविधेचा अभाव आहे. सीटी स्कॅन, एमआरआय, टूडी इको आदींच्या चाचण्या करता येत नाही. त्यासाठी वायसीएम रुग्णालयातील रुबी एलकेअरमध्ये रुग्णांना पाठविले जाते. ईसीजी, एक्स-रे, सोनोग्राफी, रक्त तपासणी आदी चाचण्या होतात. रुग्णालयामध्ये अस्थिरोग विभाग, नेत्ररोग विभागासाठी बाह्यरुग्ण उपचार सुविधा आहे. मात्र, आंतररुग्ण विभाग तसेच शस्त्रक्रिया करण्याची सोय उपलब्ध नाही. रुग्णालयात हृदयरोगाची औषधे गरजेनुसार मिळतात. सर्व औषधे मिळत नाही. थायरॉइड, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाची औषधे मात्र उपलब्ध आहेत.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालयात औषधे बाहेरून घेण्याची वेळ

महापालिकेच्या चिंचवडगाव येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालयात सध्या सोनोग्राफी करण्याची सुविधा नाही. त्यामुळे प्रसूतीसाठी येणार्‍या महिलांची कुचंबणा होत आहे. त्यांना खासगी रुग्णालयांतून सोनोग्राफी करून घ्यावी लागत आहे. ईसीजी, एक्स-रे, रक्ततपासणी आदी सुविधा आहेत. रुग्णालयात टूडी इको, एमआरआय, सीटी स्कॅन आदींची सोय उपलब्ध नाही. अतिदक्षता विभाग (आयसीयू), नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग (एनआयसीयू) या सुविधांचा अभाव आहे. रुग्णालयामध्ये कर्करोगावरील औषधे मिळत नाही. मेंदूविकार, हृदयविकार यावरील सामान्य औषधे उपलब्ध आहेत. मात्र, त्याची सर्व औषधे मिळत नाही. मधुमेह, उच्च रक्तदाब यांची औषधे मिळतात. मात्र, त्याचाही कधी-कधी तुटवडा जाणवतो. अशा परिस्थितीत रुग्णांना ही औषधे बाहेरून विकत घ्यावी लागतात.

रुग्णालयातील आंतररुग्ण विभागात उपचार घेत असलेल्या रुग्णांना रुग्णालयाकडून औषधे उपलब्ध करून दिली जातात. तसेच, बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी आलेल्या रुग्णांनादेखील बाहेरील औषधे लिहून द्यायची नाही, अशा सूचना डॉक्टरांना देण्यात आल्या आहेत. त्यांनाही रुग्णालयातून औषधे उपलब्ध करून द्यावी, असे स्पष्ट केले आहे.
            – डॉ. रवींद्र मंडपे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, नवीन थेरगाव रुग्णालय.

रुग्णालयात सध्या सोनोग्राफी मशीनची सुविधा नसल्याने त्याबाबत मागणी करण्यात आलेली आहे. रुग्णालयात पुरुष नसबंदी, कुटूंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. मधुमेह, उच्च रक्तदाब यांची औषधे उपलब्ध आहेत. तर, मेंदूविकार आणि हृदयविकाराची सामान्य औषधे उपलब्ध आहेत. सर्व औषधे नाहीत.
– डॉ. संगीता तिरुमणी, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय.

Back to top button