उरुळी कांचनचे एटीएम फोडणारे दोघे जेरबंद; दोघेही चोरटे स्थानिक | पुढारी

उरुळी कांचनचे एटीएम फोडणारे दोघे जेरबंद; दोघेही चोरटे स्थानिक

उरुळी कांचन; पुढारी वृत्तसेवा : उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत बँकेचे एटीएम मशिन फोडून फरार असलेल्या दोन संशयितांना लोणी काळभोर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे, हे चोरटे स्थानिक निघाले आहेत. अजय रामचंद्र ठवरे (वय 21, रा. पुरंदर सोसायटी, उरुळी कांचन, ता. हवेली) आणि सुमीत दिलीप बलगाडे (वय 20, रा. पीएमटी बसस्टॉपमागे, पाटीलवस्ती, उरुळी कांचन, ता. हवेली) असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील सोनाई हॉटेलशेजारी असलेल्या एचडीएफसी बँकेचे एटीएम गुरुवारी (दि. 3 नोव्हेंबर) पहाटे साडेतीनच्या सुमारास फोडण्यात आले होते. याबाबत सुरक्षारक्षक कंपनीचे झोनल मॅनेजर कृष्णा काशिनाथ गोळे यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हा गुन्हा गंभीर असल्याने लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक अमित गोरे तसेच पोलिस अंमलदार यांना योग्य त्या सूचना देऊन तत्काळ शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. या घटनेचा तपास करीत असताना तपास पथकातील पोलिस जवान दीपक सोनवणे यांना एका खबर्‍याकडून माहिती मिळाली की, या गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा उरुळी कांचनच्या शिंदवणे चौक येथे येणार आहे. ही माहिती वरिष्ठांना कळवून त्यांनी दिलेल्या आदेशानुसार शिंदवणे चौक येथे सापळा रचला. त्या वेळी खबर्‍याने दिलेल्या माहितीनुसार सदर व्यक्तीला ताब्यात घेतले.

ही कामगिरी लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक अमित गोरे, पोलिस हवालदार नितीन गायकवाड, आनंद पाटोळे, सुनील नागलोत, श्रीनाथ जाधव, संभाजी देवीकर, नीतेश पुंडे, शैलेश कुदळे, दीपक सोनवणे, निखिल पवार, बाजीराव वीर यांच्या पथकाने केली.

Back to top button