बेल्हे : आणे दरोड्यातील आरोपींना अटक | पुढारी

बेल्हे : आणे दरोड्यातील आरोपींना अटक

बेल्हे; पुढारी वृत्तसेवा : आणे शिवारात पडलेल्या दरोड्यातील दोन संशयित आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले. त्यांना न्यायालयात हजर केले असता 12 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी ही माहिती दिली.
आणे येथे 15 नोव्हेंबर रोजी पहाटे आनंदवाडी डोंगरेमळा येथील सुदाम मुर्कीदा डोंगरे यांच्या घरावर 7 ते 8 दरोडेखोरांनी दरोडा टाकला.

डोंगरे यांना काठी, कुर्‍हाडीने मारहाण करून त्यांच्या घरातील 16 हजार रुपये रोख व त्यांची पत्नी अनुसया, मेव्हणी हिराबाई यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने असा 4 लाख 44 हजार रुपयांचा मुद्देमाल त्यांनी लुटला. माळवाडी येथील सकू त्रिंबक आहेर यांच्या घरावरही दरोडेखोरांनी दरोडा टाकून सोने पळविले.

या घटनेचा तपास करीत असताना पोलिसांना पेमदरा परिसरातील जंगलात एक कार (एमएच 5 बीएल 2577) संशयितरीत्या फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गाडीत संशयित अक्षय उंबर ऊर्फ उंबर्‍या काळे (वय 26, रा.सुरेगाव, ता. श्रीगोंदार), विश्वजित रामेश्वर सानप (वय 24, रा. देहू, ता. हवेली, मूळ रा. गोविंदवाडी, ता. माजलगाव) हे दोघे आढळले.

या दोघांवर खून, चोरी, जबरी चोरी, दरोडा असे 12 गुन्हे दाखल आहेत. या दोघांना जुन्नर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 12 दिवसांची पोलिस कोठडी दिली. दरोड्यातील अन्य आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. दरोडखोरांकडून गुन्ह्यात वापरलेली कार पोलिसांनी जप्त केली आहे.

Back to top button