लोहगावात 3 इमारती जमीनदोस्त; अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरूच राहणार | पुढारी

लोहगावात 3 इमारती जमीनदोस्त; अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरूच राहणार

येरवडा; पुढारी वृत्तसेवा : लोहगाव परिसरातील कर्मभूमीनगर, आदर्शनगर, वाघोली रस्ता येथील अनधिकृत बांधकामांवर महापालिका प्रशासनाकडून धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत तीन इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. यामुळे अनधिकृत बांधकामे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. महापालिका प्रशासनाकडून एम. आर. टी. पी. 1966 अनन्वे कलम 53 नुसार लोहगाव परिसरातील सर्व्हे नंबर 82 मधील कर्मभूमीनगर, आदर्शनगर व वाघोली रस्ता येथे अनधिकृत बांधकाम करणार्‍या व्यावसायिकांना नोटिसा बजाविण्यात आल्या होत्या. मात्र, संबंधित बांधकाम व्यावसायिकांनी या नोटिसांना कोणतेही उत्तर दिले नाही.

यामुळे प्रशासनाने 9350 चौरस फूट क्षेत्रफळावरील अनधिकृत बांधकामांवर ही कारवाई केली. यात तीन इमारतींचे आर. सी. सी. बांधकाम पाडण्यात आले. ही कारवाई एक कटर ब्रोकर, दोन जेसीबी, दोन गॅसकटर आणि बिगारींच्या साहाय्याने करण्यात आली. या वेळी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. महापालिकेचे कार्यकारी अभियंता अजित सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता हनुमान खलाटे, शाखा अभियंता प्रतीक पाथरकर, प्रकाश कुंभार, संदीप धोत्रे व वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजू अडगळे यांनी ही कारवाई केली.

नागरिकांनी अनधिकृत बांधकामे करू नयेत. बांधकाम विभागाची परवानगी घेऊनच बांधकामे करण्यात यावीत. यापुढे सातत्याने अनधिकृत बांधकामांवरील कारवाईची मोहीम सुरूच राहणार आहे.
                                                               – हनुमान खलाटे,
                                                          उपअभियंता, महापालिका

 

Back to top button