मोशी- डुडुळगाव परिसरात भात काढणीला वेग | पुढारी

मोशी- डुडुळगाव परिसरात भात काढणीला वेग

मोशी : पुढारी वृत्तसेवा :  डुडुळगाव मोशी, परिसरात खरीप हंगामातील भात कापणी, भात पेंढा गोळा करणे आदी कामे अंतिम टप्प्यात असून कार्तिकी वारी सांगता झाल्यानंतर परिसरातील शेतकरी पुन्हा शेतीच्या कामाला लागला आहे. भात कापणी व भाताला वारा देण्याच्या कामात शेतकरी मग्न असून सद्या शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात मजूर टंचाई जाणवत असल्याचे चित्र आहे. स्थानिक शेतकरी प्रभाकर वहिले, सदाशिव वहिले, आत्माराम वहिले, नवनाथ वहिले, विष्णू धायरकर यांनी सांगितले, की सद्या या भागात भात शेती करणेदेखील परवडत नसून अतिवृष्टी आणि मजूर टंचाई या दोन प्रश्नांनी शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

भात कापणी व भात झोडणी झाल्यानंतर भात ऊफणनी केली जाते. भात बियाण्यांतील कचरा, लहान गवताचे तुकडे काढून टाकले जातात. काही ठिकाणी आधुनिक यंत्राचा म्हणजे पंख्याच्या हवेचा आधार घेऊन, भात सुपामध्ये धरून पंख्यांच्या समोर भात ऊफणनी केली जाते. यामुळे जलद गतीने भात ऊफणनी होते. तर, काही ठिकाणी नैसर्गिक वार्‍याच्या साहय्याने वारेवणी करतात, असे कृषी साहायक शिल्पा सुभेदार यांनी सांगितले.

पुरुषांबरोबर महिला वर्गाचाही मोठा सहभाग असतो. एकूणच परतीचा पाऊस थांबल्यानंतर शेतशिवारं गजबजली असून, यंदा चांगला पाऊस झाला असल्यामुळे भात उत्पादनात वाढ झाल्याने शेतकरी राजा आनंदी दिसत आहे, असे कृषिमित्र कुंदाकिनी वहिले यांनी सांगितले.

Back to top button