पुणे : गुन्हेगाराच्या खुनातील तीन सराइतांना अटक | पुढारी

पुणे : गुन्हेगाराच्या खुनातील तीन सराइतांना अटक

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सराईत गुन्हेगाराच्या खून प्रकरणात फरारी असलेल्या मुख्य सूत्रधारासह तिघांना गुन्हे शाखे (युनिट एक)च्या पथकाने अटक केली. पूर्ववैमनस्यातून नाना पेठेत तीन दिवसांपूर्वी सराइताचा कोयत्याने वार करून, दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. सुशांत ऊर्फ मट्या शशिकांत कुचेकर (28), तेजस अशोक जावळे (32), अतिष अनिल फाळके (27, रा. सर्व रा. नाना पेठ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तिघेही रेकॉर्डवरील असून, यातील मुख्य आरोपीवर 16 गुन्हे दाखल आहेत. रोहन पवार असे खून झालेल्याचे नाव आहे.

गजबजलेल्या वस्तीत घटना घडल्याने खळबळ उडाली होती. यातील काही आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक केली. मुख्य सूत्रधार कुचेकर, जावळे, फाळके यांच्यासह इतर साथीदार फरारी झाले होते. गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेकडून सुरू होता. पुढील कारवाईसाठी आरोपींना समर्थ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, रमेश तापकीर, अजय जाधव, महेश बामगुडे, राहुल मखरे, अजय थोरात, अय्याज दड्डीकर, अमोल पवार, तुषार माळवदकर यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

 

Back to top button