ओतूर : विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्यास जीवदान | पुढारी

ओतूर : विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्यास जीवदान

ओतूर : पुढारी वृत्तसेवा : ओतूर येथील एका विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्यास जीवदान देण्यास ओतूर वनविभागाला यश आले आहे. ओतुरच्या गाढवेमळा येथील महादेव तानाजी गाढवे या शेतकऱ्याच्या गट क्र. १५६ च्या सामुहिक विहिरीत बिबट्याचा लहान बछडा पडला असल्याची माहिती शरद अर्जुन गाढवे या शेतकऱ्याने वनविभागाला दूरध्वनीवरून कळवली. ओतूर विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी तातडीने दखल घेत रेस्क्यू टीमचे सदस्य विजय वायाळ, मंदार अहिनवे, गंगाराम जाधव, किसन केदार व वनपाल सुधाकर गिते, वनरक्षक परशुराम खोकले यांचे समवेत घटनास्थळी धाव घेतली.

रेस्क्यू टीम व ओतूर वनविभाग कर्मचारी यांनी बिबट बछडा (अंदाजे वय ४ महीने) यास अथक परिश्रम घेत विहिरीबाहेर काढून योग्य ते औषधोपचार करून रात्री पुन्हा त्याच घटनास्थळानजीकच्या ऊसाच्या शेतात ठेवले. दरम्यान रात्रीच्या सुमारास बिबट मादीने बछड्याचा पुन्हा ताबा घेतला. मादी बिबट व बछड्याचा झालेला मिलाप हृदयस्पर्शी आहे.

Back to top button