इंदापुरात मका मळणीच्या कामात शेतकरी गर्क! | पुढारी

इंदापुरात मका मळणीच्या कामात शेतकरी गर्क!

बावडा; पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्यात सध्या रस्त्याने ये- जा करताना सर्वत्र खरीप हंगामातील मकेची काढणी, मळणीची कामे वेगात सुरू असल्याचे दिसते. शेतकर्‍यांना आर्थिक आधार देणारी मका हे पीक असल्याने सध्या शेतकरी वर्ग मकेच्या काढणी-मळणीच्या कामात गर्क असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. परतीच्या पावसाने मका पिकाला फटका बसला असून उत्पन्नात घट झाल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. तसेच परतीच्या पावसाने काढणी- मळणीच्या कामांना अडथळा निर्माण झाला होता. सध्या पिकांची काढणी व मळणीची कामे सर्वत्र जोरात सुरू आहेत. मका पिकाची काढणी करणे, कणसे वाळविणे, मळणी करणे आदी कामांमध्ये शेतकरी व शेतमजूर वर्ग गर्क आहे.

बाजारात मक्याला चांगला दर असल्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण असल्याची माहिती प्रगतशील शेतकरी रामभाऊ पाटील (चाकाटी), दयानंद गायकवाड (बोराटवाडी), राहुल कांबळे (खोरोची), एच. के. चव्हाण (भोडणी) यांनी दिली. काढणी झाल्यानंतर वाळलेले मकवान जनावरांना चार्‍यासाठी गोठ्याशेजारी शेतकरी साठवून ठेवत आहेत. त्यामुळे मका पीक हे शेतकर्‍यांना कल्पवृक्षासारखे वाटत आहे.  परिणामी, चालू रब्बी हंगामातही मकेची मोठ्या क्षेत्रावर लागवड झाल्याचे मका उत्पादक शेतकरी काशिनाथ अनपट (लाखेवाडी) आणि शिरीष वाघमोडे (काटी) यांनी सांगितले.

Back to top button