पिंपरी : उद्याने, बांधकामासाठी प्रक्रियायुक्त पाणी वापरा : आयुक्त शेखर सिंह | पुढारी

पिंपरी : उद्याने, बांधकामासाठी प्रक्रियायुक्त पाणी वापरा : आयुक्त शेखर सिंह

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराला पिण्याचे पाण्याची कमतरता भासत आहे. पिण्याच्या पाण्याची बचत करण्यासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले पाणी बांधकाम, उद्यान, बागकाम, गाड्या धुणे (वॉशिंग सेंटर), आगीवर नियंत्रण आणणे , रस्ते सफाई व इतर कामांसाठी तसेच, औद्योगिक कंपन्यांनी वापरावे. त्यासाठी पिण्याचे पाणी वापरू नये, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी शहरवासीयांना केले आहे. तसेच, पिण्याचा पाण्याचा काटसकरीने वापर करण्याचेही आवाहनही केले आहे.

शहराची लोकसंख्या 27 लाखांच्या पुढे गेली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची मागणी वाढत आहे. पालिका दररोज 510 एमएलडी पाणी शहराला पुरविते. संपूर्ण शहराला ते पाणी पुरेसे ठरत नसल्याने गेल्या तीन वर्षांपासून दिवसाआड पाणी दिले जात आहे. अशुद्ध पाणी शुद्धीकरण यंत्रणेची क्षमता वाढीवर भर दिला जात आहे. तसेच, सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाण्याचा पुनर्वापर करून त्या पाण्याचा वापर करण्याचे आवाहन महापालिका वारंवार करीत आहे. पालिकेच्या उद्यानासाठी पुनर्वापर केलेले पाणी वापरले जात असल्याचा दावा केला जात आहे.

आयुक्त सिंह यांनी सांगितले की, पिण्याच्या पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. पिण्याच्या पाण्याचे नैसर्गिक स्त्रोतही घटत आहेत. पाण्याचा वापर काटकसरीने करण्याची आवश्यकता आहे. पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त बांधकाम, बागकाम, रस्ते सफाई, औद्योगिक क्षेत्र, अग्निशमन आदी कामांसाठीही पाण्याची मागणी वाढत आहे. पालिकेच्या वतीने मैला सांडपाणी केंद्रात प्रक्रिया केलेले पाणी नदीत सोडले जाते. त्या पाण्याचा पुनर्वापर करण्याचा निर्णय पालिकेने केला आहे.

बांधकाम, उद्यान,गाड्या धुणे, आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाने, रस्ते सफाई व इतर कामांसाठी तसेच, औद्योगिक कंपन्यांनी सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले पाणी वापरावे. त्या पाण्याचा वापर वाढल्यास सांडपाणी कमी होणार असून, नदी प्रदुषणामध्ये घट होणार आहे. प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर नागरिकांसह बांधकाम व्यावसायिक, औद्योगिक कंपन्यांनी वाढवावा, असे आवाहन आयुक्त सिंह यांनी केले आहे. पालिकेच्या विविध विभागांनीही या प्रकाराचे पाणी वापरावे, असा सूचना त्यांनी केल्या आहेत.

Back to top button