दौंड शहरात पाणीबाणी! पाणीपुरवठा करणारा तलाव कोरडाठाक | पुढारी

दौंड शहरात पाणीबाणी! पाणीपुरवठा करणारा तलाव कोरडाठाक

दौंड; पुढारी वृत्तसेवा : दौंड शहराला मागील सात वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यातच आता हिवाळ्यातच शहराला पाणीपुरवठा करणार्‍या तलावातील पाणी पूर्णपणे संपले आहे. त्यामुळे दौंडकर नागरिक पूर्णपणे वैतागले असून, त्यांना पाण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे. वास्तविक दौंड नगरपालिकेने मुळा मुठा कालवा दुरुस्तीचे काम सुरू करण्यापूर्वीच पाण्याची मागणी करायला हवी होती. परंतु दौंड नगरपालिकेत अधिकारी, कर्मचारी यांचा कुठलाही ताळमेळ नाही, त्यामुळे दौंडकरांवर ही वेळ आली असल्याचे बोलले जात आहे.

चालू वर्षी भरपूर प्रमाणात पाऊस झाला व मुबलक पाणीदेखील उपलब्ध होते. तरीदेखील दौंड नगरपालिकेने शहरासाठी पिण्याच्या पाण्याचे नियोजन योग्य केले नाही. परिणामी शहरात पाणीबाणी उभी झाली आहे. त्यातच मागील महिन्यापासून मुख्याधिकारी एक महिन्याच्या रजेवर गेले आहेत. त्यामुळे नगरपालिकेत सर्व काही आलबेल सुरू आहे. पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी हे दररोज पुण्याहून ये-जा करत असल्याने 11 ते 4 वाजेपर्यंतच कामकाज करतात. त्यानंतर ते पुणे येथे निघून जातात. त्यामुळे दौंड नगरपालिकेत याबाबत चौकशी केली असता आम्ही पत्र दिले आहे. परंतु कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम सुरू असल्याने पाणी सोडण्यात आले नाही, असे उत्तर त्यांनी दिले.

कालव्याच्या दुरुस्तीचे काम करायचे होते तर नगरपालिकेने दौंड शहराला जवळपास महिनाभर पुरेल एवढा पाणीसाठा आधीच करून ठेवायला हवा होता. जेणेकरून आता नागरिकांचे हाल झाले नसते. परंतु नगरपालिकेवर कोणाचा अंकुश नाही. त्यामुळे कर्मचारी मनमानी पद्धतीने कारभार करतात. याची वरिष्ठ अधिकारी चौकशी का करत नाहीत, या कर्मचाऱ्यांना कोणाचा वरदहस्त आहे, याची चौकशी वरिष्ठ अधिकारी करतील का? असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.

 

Back to top button