सोमेश्वरनगर; पुढारी वृत्तसेवा : निरा- बारामती रस्त्यावर वाघळवाडी गावच्या हद्दीत भारत पेट्रोल पंपासमोर उसाने भरलेली ट्रॉली पलटी झाली. रविवारी (दि. 19) सकाळी सव्व्वासात वाजता ही घटना घडली. मात्र घटनेत कोणतीही दुर्घटना झाली नसली तरीही धोकादायक उसाची वाहतूक हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. सोमेश्वर कारखान्यावर निरा बाजूने उसाने भरलेल्या दोन ट्रॉली जात असताना अक्षय गार्डनसमोर पुढील उतारावर हा अपघात घडला आहे. ट्रॉली पलटी झाल्यावर रस्त्यावर सर्व ऊस पडला.
तातडीने हा ऊस बाजूला करत रस्ता मोकळा करण्यात आला. रविवारी सकाळी या रस्त्यावर वर्दळ कमी होती, त्यामुळे कोणताही अनर्थ घडला नाही. ही ट्रॉली उशिरा पलटी झाली असती तर अपघात होण्याची शक्यता होती. सुरक्षित वाहतूक धोरण राबविण्याबाबत कारखाना प्रशासन, प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) आणि पोलिसांनी सहकार्य केल्यास अपघातांची संख्या कमी होण्यास मदत होणार आहे.
तेवढ्यापुरती व्यक्त होते हळहळ
अनेकदा या मार्गावर गाळप हंगामात अपघात होतात. तेवढ्यापुरते सर्वजण अपघातांबद्दल हळहळ व्यक्त करतात; मात्र वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. अरुंद रस्ता, खचलेल्या साईटपट्ट्या, वाहनांची सर्वाधिक वाहतूक, जीवघेणे गतिरोधक, झाडांच्या धोकादायक फांद्या, नियमाप्रमाणे व सुरक्षित वाहतूक न होणे यामुळे हा मार्ग नेहमीच चर्चेत असतो. अपघातामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे, तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे.