आळंदी : अलंकापुरीत साडेतीन लाख भाविक; वारकर्यांची मांदियाळी
आळंदी, पुढारी वृत्तसेवा : मुख दर्शन व्हावे आता, तू सकळ जगाचा त्राता, घे कुशीत गा माऊली तुझ्या, पायरी ठेवतो माथा. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या 725 व्या संजीवन समाधी सोहळ्यात एकादशीनिमित्त अलंकापुरीत राज्यासह देशभरातून आलेल्या साडेतीन लाख भाविक वारकर्यांनी माउलींचे दर्शन घेतले. मराठवाडा, विदर्भ, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र, कोकणातून आलेल्या दिंड्यामुळे अलंकापुरी भारावली होती. शेकडो किलोमीटरचा प्रवास करीत माउलींच्या नगरीत दाखल झालेल्या प्रत्येक पावलांना माउलींच्या समाधीचे मुख दर्शन व्हावे, याची आस लागली होती. हजारोंच्या संख्येने शहरात दाखल झालेल्या दिंड्यामुळे रस्त्यावर प्रचंड गर्दी होती.
एकादशी असल्याने मोठ्या संख्यने दिंड्या दुपारी नगरप्रदक्षिणेसाठी बाहेर पडल्या. चाकण चौकात सुरू झालेली प्रदक्षिणा वडगाव रस्ता, हजेरी मारुती मंदिर, पोलिस ठाण्यासमोरून, नगर परिषद चौकमार्गे इंद्रायणी घाट व माउली मंदिर अशी होत होती. यामुळे संपूर्ण प्रदक्षिणा मार्ग वारकऱ्यांच्या संख्येने गर्दीने दिवसभर फुलून गेला होता.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या संजीवन समाधी सोहळा कार्तिकीवारीत आलेल्या कार्तिकी एकादशीच्या भक्ती पर्वणीचा योग साधण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक आळंदीत दाखल झाले होते. इंद्रायणी घाटावर त्यांनी फुगडीचा फेर धरला, तर काहींनी टाळ-मृदंगाच्या गजरात देहभान विसरून नाचण्याचा आनंद लुटला. पहाटेपासूनच वारकर्यांच्या राहुट्या व धर्मशाळांमधून अभंगाच्या सुरावटी निघू लागल्या आहेत.
टाळ-मृदंगाचा गजराने आसमंत भरून गेला असून, स्नानासाठी इंद्रायणीच्या तीरावर वारकर्यांची गर्दी होऊ लागली आहे. कार्तिकीसाठी इंद्रायणीला पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे ती दुथडी भरून वाहत आहे. त्यानुसार भाविकांची भक्तीही जणू दुथडी भरून वाहत होती. दुसरीकडे माउलींच्या मंदिरामध्ये पहाटेपासून विविध धार्मिक विधीला सुरुवात झाली होती. स्नानानंतर माउलींच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी दर्शनबारी पूर्णपणे भरून गेली होती.