दै. ‘पुढारी’ आयोजित’ राईज अप’ महिलांचा अंतिम सामना; अस्पायर फुटबॉल क्लब संघाला विजेतेपद | पुढारी

दै. ‘पुढारी’ आयोजित’ राईज अप’ महिलांचा अंतिम सामना; अस्पायर फुटबॉल क्लब संघाला विजेतेपद

पुणे; पुढारी वृत्तसेवा : दै. ‘पुढारी’ आयोजित’ राईज अप’ महिलांच्या फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अस्पायर फुटबॉल क्लब संघाने पुणेरी वॉरियर्स संघाचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. वॉरियर्स संघाला उपविजेतेपद तर क्रीडा प्रबोधिनीला तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले. दै. ‘पुढारी’ आयोजित या स्पर्धा महाराष्ट्रीय मंडळ (मुकुंदनगर) येथील मैदानावर पार पडल्या. अंतिम सामन्यामध्ये दोन्ही संघांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळाला सुरुवात केली. पहिल्या सत्रामध्ये अस्पायर फुटबॉल क्लबच्या सपना राजपुरे हिने सातव्या मिनिटाला पहिला गोल करीत संघाचे खाते उघडले. त्यानंतर दोन्ही संघांच्या वतीने गोल करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, परंतु खेळाडूंना अपयशच आले.

अंतिम सामन्यामध्ये पुणेरी वॉरियर्सच्या संघातील खेळाडूंनी आक्रमक खेळ दाखविला. गोलांची संख्या वाढविण्यासाठी अस्पायर संघाच्या खेळाडूंनी तेवढाच खेळ चांगला केला. अखेर या सामन्यात अस्पायर संघाने बाजी मारत विजेतेपद पटकाविले. विजेत्या अस्पायर संघाला करंडक, 15 हजार रुपये रोख, करंडक, मेडल्स आणि प्रशस्तिपत्रक, उपविजेत्या पुणेरी वॉरियर्स संघाला रोख 10 हजार रुपये रोख, करंडक, मेडल्स आणि प्रशस्तिपत्रक तर तृतीय क्रमांकाच्या क्रीडाप्रबोधिनी संघाला 5 हजार रुपये रोख, करंडक, मेडल्स आणि प्रशस्तिपत्रक प्रदान करण्यात आले.

सर्वात जास्त गोल करणार्‍या पुणे सॉकर क्लबच्या उर्वी साळुंखे हिला उत्कृष्ट गोलकिपर म्हणून, अस्पायरच्या अंजली कारके हिला उत्कृष्ट डिफेंडर म्हणून, पुणेरी वॉरियर्सच्या अनुष्का पवार हिला इमर्जित खेळाडू म्हणून, तर अस्पायरच्या अंबर कौर हिला करंडक देऊन गौरविण्यात आले. पंच म्हणून राहुल भंडारी, मुरली क्रिष्णा, हरजित गोराई, मोहित पाठक, रिचर्ड फ—ान्सिस, नवीन हेतेकेरुर, संतोष कांबळे, आशिष हातेकर, एस. टी नायडू, विनय कोंडामौरी आणि वैभव महाले यांनी काम पाहिले. अभिषेक अय्यर आणि अभिषेक परदेशी समन्वक होते.

Back to top button